शिंदेंच्या खासदारांना केंद्रात मंत्रिपदे?
#मुंबई
राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील अंतर्गत वाद अलीकडे मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येत आहे. जागावाटप, एकाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्याने निरीक्षक नेमणे यावरून वादाच्या ठिणग्या उडत असतानाच त्यावर उतारा म्हणून शिंदे गटाच्या दोन खासदारांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देणार असल्याची चर्चा गंभीरपणे सुरू आहे.
शिवसेनेच्या दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे दोन खासदार नेमके कोणते? यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काही काळाने त्यांच्या गटात एकूण १८ पैकी १२ खासदार सामिल झाले. आजघडीला हे सर्व खासदार मुख्यमंत्री शिंदेंसोबत कायम आहेत. या बारा खासदारातून दोन खासदारांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. ४) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये केंद्रातील मंत्रिमंडळात होणारे फेरबदल आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी म्हणजेच १९ जूनच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे हे बदल लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रात मंत्रिपदासाठी शिवसेनेचे अनेक खासदार इच्छुक आहेत. यात मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांचेही नाव चर्चेत आहे. कीर्तीकर हे अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत जोडलेले आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. अशा परिस्थितीत गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता भाजपचे ज्येष्ठ नेते कीर्तीकर यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याची शक्यता आहे. कीर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणूनही ओळखले जातात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये भाजप शिवसेनेच्या खासदारांना सन्मानजनक वागणूक देत नसल्याचा आरोप गजानन कीर्तीकर यांनी केला होता. इतकेच नाही तर त्या संदर्भात त्यांनी माध्यमांसमोर जाहीर नाराजी व्यक्त करीत ही बाब चव्हाट्यावर आणली होती. हा मुद्दा पकडून ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे यांच्यावर टीका करत सर्व काही सुरळीत नसल्याचा दावा केला होता. दुसरीकडे, शिंदे गट आणि आमच्यात सर्व काही आलबेल आहे, हे सांगताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलीच सारवासारव करावी लागली होती.
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रिपदासाठी बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता याआधीदेखील वर्तवण्यात आली होती. खासदार जाधव यांचे गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे. इतकच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी बुलढाण्यात येऊन माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानदेखील जाधव यांनी दिले होते.
खासदार प्रताप जाधव यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथे सभा घेतली होती. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी खासदार जाधव यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यानंतर जाधव यांनीही उद्धव ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.
राज्यात महिलांना संधी, काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू
सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकादेखील झाली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना नक्की संधी मिळणार असल्याचे कळते. त्याचप्रमाणे काही नवोदित आमदारदेखील मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी सध्याच्या मंत्रिमंडळातील काही आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. काही मंत्री फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुका असल्याने अशा चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून बाजूला सारून त्याऐवजी नव्या आमदारांना संधी दिली जाऊ शकते.
राज्यात १९ जूनपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारास मुख्यमंत्री आग्रही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचे या भेटीकडे लक्ष्य लागले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत भाजपच्या वतीने देण्यात आले आहेत. १९ जून हा मूळ शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करावा, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे.
वृत्तसंस्था