आपण मुख्यमंत्री होणार, हे शिंदेंना माहीत होते...

आपणच मुख्यमंत्री होणार हे एकनाथ शिंदे यांना बंडाच्या महिनाभर आधीच माहीत होते. सगळी सूत्रे दिल्लीतून हलत होती, त्यांनी स्वत: मला हे सांगितले होते, असा स्फोटक दावा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 18 Jun 2023
  • 02:29 am

आपण मुख्यमंत्री होणार, हे शिंदेंना माहीत होते...

शिंदेव्यतिरिक्त केवळ अमित शहांना होते ठाऊक, फडणवीसांना कल्पनाही नव्हती; आमदार नितीन देशमुख यांचा स्फोटक दावा

#मुंबई 

आपणच मुख्यमंत्री होणार हे एकनाथ शिंदे यांना बंडाच्या महिनाभर आधीच माहीत होते. सगळी सूत्रे दिल्लीतून हलत होती, त्यांनी स्वत: मला हे सांगितले होते, असा स्फोटक दावा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

भाजपचा राज्यातील चेहरा असलेले तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ महाविकास आघाडी सरकार पडणार, एवढेच माहिती होते. मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दल त्यांना कोणतीही माहिती नव्हती, असा दावादेखील नितीन देशमुख यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यूट्यूब चॅनलवर आदेश बांदेकर यांनी सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची मुलाखत घेतली, त्यावेळी देशमुख यांनी वरील माहिती दिली.

शिंदेंनी बंड केल्यानंतर ज्यांनी मागे थांबून मातोश्रीवर चर्चा केली, तेच या बंडाचे खरे सूत्रधार होते. आम्हाला या सर्व गोष्टींची कुणकुण लागली होती. मात्र, उद्धव ठाकरेंना हे सांगायचे कसे? आपण पहिल्यांदा निवडून आलोय, अशी आमच्या मनात भीती होती,’’ असेदेखील देशमुख यांनी या मुलाखतीत सांगितले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आले होते. उद्धव ठाकरे सरकारने आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पण गतवर्षी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह बंडखोरी केली आणि ठाकरे सरकार कोसळले. नंतर शिंदेंनी भाजपसोबत घरोबा करत सरकार स्थापन केले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले.

या संपूर्ण घटनाक्रमात पडद्यामागे नेमके काय घडले? शिवसेनेचे आमदार सूरतला कसे पळाले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे केव्हा ठरले? आदी अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहेत, ज्यांचे समर्पक उत्तर त्यांना आजतागायत मिळाले नाही, पण या सर्व प्रश्नांशी संबंधित एक मुलाखत सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

बंडाबाबत महिनाभरापूर्वीच कळले होते...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे आम्हाला बंडखोरीच्या महिनाभर अगोदरच समजले होते. कदाचित देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नसेल, पण एकनाथ शिंदे यांनी ‘मी मुख्यमंत्री होणार आहे,’ असे मला सांगितले होते. बंडखोरी होणार आणि सत्ता हस्तांतरित होणार हे फडणवीसांना माहीत होते, पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहीत नव्हते, असे नितीन देशमुख म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे खुद्द शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनाच ठाऊक होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा ‘मीच शिंदेंना मुख्यमंत्री केलं,’ हा दावा निखालस खोटा आहे. प्रत्यक्षात कोण मुख्यमंत्री होणार हे त्यांना ठाऊकच नव्हते, असा दावा नितीन देशमुख यांनी या मुलाखतीत केला आहे.

उद्धव ठाकरे भेटत नव्हते हा आरोप खोटा

उद्धव ठाकरे आमदारांना उपलब्ध नसायचे. त्यांनी आमदारांची भेट नाकारल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘मी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा ठाकरे आम्हाला खूप वेळ द्यायचे. त्यामुळे ठाकरे आमदारांना वेळ देत नव्हते, हा आरोप धादांत खोटा आहे. उलट मंत्रीच आम्हाला वेळ देत नव्हते.’’

ठाकरे सरकार आल्यावर सहा महिन्यांनी ‘हालचाली’

नितीन देशमुख म्हणाले की, ‘‘शिवसेनेतील बंड हे काही अचानक झालेले बंड नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्यानंतर सहा महिन्यांनी या हालचाली सुरू झाल्या होत्या. आम्हाला या सगळ्याची कुणकुण अगोदरच लागली होती. मी आणि कैलास पाटील यांनी आधीच ठरवले होते की उद्धव ठाकरेंना सोडायचे नाही, पण या बंडाची माहिती त्यांना कशी द्यायची, आपण पहिल्यांदा निवडून आलो आहोत, अशी भीती आमच्या मनात होती. आमदार फुटायला सुरुवात झाल्यावर मी माझ्या पीएसोबत चर्चा केली होती. २२ पर्यंत आमदार फुटतील, असे वाटले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटतील, असा अंदाज नव्हता, असेही देशमुख यांनी सांगितले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest