NEET परीक्षेत मुलींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी, राज्य महिला आयोगाकडून चौकशीची मागणी

देशभरात नुकत्याच पार पडलेल्या नीट परिक्षेत मुलींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी करून उघड्यावर कपडे घालण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीची मागणी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 10 May 2023
  • 01:55 pm
NEET exam : NEET परीक्षेत मुलींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी

NEET exam : NEET परीक्षेत मुलींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी

रुपाली चाकणकरांनी दिले अहवाल सादर करण्याचे निर्देश

देशभरात नुकत्याच पार पडलेल्या नीट परिक्षेत मुलींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी करून उघड्यावर कपडे घालण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील सांगली येथील केंद्रासह चंदीगड आणि पश्चिम बंगालच्या काही केंद्रावर घडला आहे. आता या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीची मागणी केली आहे.

याबाबत बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमानी समोर आणले आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचे झाल्यास, सांगलीमध्ये विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणं अशा तक्रारी आल्या आहेत. तक्रार दाखल झाल्याने सांगलीमधील प्रकार समोर आला आहे. मात्र ही परीक्षा संपूर्ण राज्य भरात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे? याची माहिती घेणे आवश्यक आहे.

परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत”, अशीही माहिती चाकणकर यांनी यावेळी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest