संग्रहित छायाचित्र
काही दिवसांपूर्वी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर दूध आणि भोजन घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज आपला मोर्चा आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याकडे वळवला. सावंत यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप पवार यांनी केला. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी आरोग्य विभागातील भ्रष्टाचारासंबंधी गंभीर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून हा पैसा निवडणुकीसाठी वापरला जाणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून त्यांनी राज्याला भिकारी केले आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित आणि बीव्हीजी या दोन कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
दरम्यान, पत्रकार परिषदेत खेकडा दाखवत आमदार रोहित पवार यांनी मंत्री तानाजी सावंत यांना डिवचले. सावंत यांनी खेकड्याने पोखरल्यामुळे धारणांना गळती लागते या आशयाचे विधान केले होते. त्याचा संदर्भ घेत आमदार पवार म्हणाले की, सावंत यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. हा खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जावून बसतो. लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो. हा खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय. या शब्दांत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टिका केली.
या भ्रष्टाचारबाबत आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. स्वच्छता काम टेंडर मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. अत्यावशक सेवेसाठी स्पॅनिश कंपनीला टेंडर दिले गेले होते. त्यांच्या सोबत करार झाला होता. हे टेंडर सुमित कंपनी यांनी डिझाईन केले आणि त्यांनाच मिळाले. त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना त्यांना नियमबाह्य पध्दतीने रुग्णवाहिका पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. त्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हीजी कंपनीलाही नाराज न करता त्यांनादेखील टेंडर मध्ये सामावून घेतले. ही सुमित कंपनी पिंपरी चिंचवड येथील असून अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची ही कंपनी आहे अशी माहिती रोहित पवार यांनी दिले आणि पुढील पाच दिवसांत मंत्री तानाजी सावंत यांनी आपली बाजू मांडावी असे आव्हान त्यांनी केले आहे.