संग्रहित छायाचित्र
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य प्रकारे सुरू आहे. आरोपींना फासावर चढवणं हा आमचा प्रयत्न आहे. यासोबतच बीड हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा ही मागणी सगळ्यात आधी मी केली होती असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी नाव जोडण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
राजीनामा देण्याच्या मागणीसंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, "मी राजीनामा का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. मी ना आरोपी आहे किंवा माझा काही संबध आहे. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा यापद्धतीने मागणी केली जात आहे".
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विधान केलं होतं. वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर देताना मुंडे म्हणाले, वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत. पण ही मोठा आका , छोटा आका अशा पद्धतीची भाषा मी पहिल्यांदाच ऐकतोय. पोलीस प्रशासन आणि सीआयडी हे या प्रकरणाचा अतिशय योग्य तपास करत आहेत. दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आणि ज्यांनी केली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचा प्रयत्न आहे. कुणी काय बोलावं, कुणाचं काय होणार याला काही अर्थ नसल्याचं मुंडे म्हणाले.
मुंडे म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात जावं ही मागणी पहिल्यांदा मीच नागपूर अधिवेशनात केली. त्यामुळे लगेचच राहिलेल्या आरोपींना अटक करून चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवून हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे हे तपास यंत्रणेवर दबाव आणू शकतात, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा अशी विरोधकांची मागणी आहे. याबाबत विचारले तेव्हा मुंडे म्हणाले, म्हणूनच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. हा तपास न्यायालयीन पण होणार आहे. त्यामुळे मंत्री म्हणून तपासवर मी प्रभाव टाकूच शकत नाही. त्यासाठीच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे.
सर्वपक्षीय आमदार संतोष देशमुख यांच्या हत्येच्या बाबतीत एकवटले आहेत. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे झालेले नाही. या हत्येमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हीच भूमिका सर्वांची असल्याचे मुंडे म्हणाले.
बीडमध्ये एक पलंग गायब झाल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलं आहे. या खाटा आधीच मागवल्या होत्या. घटना घडल्यानंतर किंवा आरोपी अटक होणार तेव्हा मागवलेल्या नाहीत. पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.