Mumbra Marathi Language Controversy: ...तर घरात घुसून मारू; अविनाश जाधव आक्रमक; मुंब्य्रात नेमकं घडलं तरी काय?

मराठी अमराठी वादापर्यंत पोहचलेली कल्याणमधील घटना ताजी असतानाच मुंब्य्रात धक्कादायक घटना घडल्याचे पाहायला मिळालं आहे. एका अमराठी व्यक्तीनं मराठी व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनसेनं गंभीर शब्दात इशारा दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 04:40 pm

Mumbra Marathi Language Controversy

 मराठी अमराठी वादापर्यंत पोहचलेली कल्याणमधील घटना ताजी असतानाच मुंब्य्रात धक्कादायक घटना घडल्याचे पाहायला मिळालं आहे. एका अमराठी व्यक्तीनं मराठी व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनसेनं गंभीर शब्दात इशारा दिला आहे. 

 

मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला महाराष्ट्रातच कान पकडून माफी मागण्याची वेळ आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.  घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मनसैनिकांनी मराठी तरुणाची पाठराखण केली आहे. या युवकाच्या वा त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी आहे, याला काही झालं तर घरात घुसून मनसे काय आहे हे दाखवलं जाईल , अशा शब्दात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे. 

 

नेमकं घडलं तरी काय? 

ही घटना गुरुवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास घडली. मुंब्य्रातील कौसा या भागात एक तरुण  एका फळविक्रेत्याकडे फळं खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा फळविक्रेत्यानं हिंदीत संवाद सुरु केला. त्यावेळ खरेदी करणाऱ्या तरुणाने त्याला मराठील बोला असं सांगितलं. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, फळविक्रेत्याने सहकाऱ्यांना बोलावलं. सहकारी आणि फळविक्रेत्याने तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडलं. 

 

या घटनेनंतर त्यातल्याच एकानं फळं विकत घेणाऱ्या तरुणाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल केली. यानंतर पोलिसांनी तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्याची चौकशी केली.

 

आज पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाल्यानंतर सदर तरुणानं आपल्याला भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. “त्यांनी मला शिवीगाळ केली. मी म्हटलं शिव्या देऊ नका. तर त्यानंतर मला म्हणाले माफी माग. मी माफीही मागितली. पण मला नंतर पोलीस स्टेशनमध्ये चार तास बसवून ठेवलं. माझ्या आईलाही स्टेशनबाहेर बसवून ठेवलं. माझी आई घाबरली आहे. पुढच्या वेळी मुंब्र्याला आल्यानंतर मला काही झालं तर काय अशी भीती आम्हाला वाटते आहे. त्यांच्यातल्याच एकानं माझ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे”, अशी प्रतिक्रिया सदर तरुणानं दिली आहे.

 

Share this story

Latest