संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीत महायुतीला 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेने दणदणीत विजय मिळवून दिला. मात्र आता सरकार स्थापन होवून एक महिना झाला आहे. निवडणुकीआधी सरसकट 'लाडक्या' वाटणाऱ्या बहिणी आता महायुती सरकारला 'दोडक्या' वाटू लागल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या एका लाभार्थी महिलेचे पैसे सरकारी तिजोरीत पुन्हा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला योजनेच्या निकषात बसत नव्हती. मात्र तरीही तिने अर्ज केला होता. योजनेतून तिला साडेसात हजार रूपये प्राप्त झाले होते. मात्र हे पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे आपले पैसे राहणार की जाणार असा संभ्रम आता लाडक्या बहीणींमध्ये निर्माण झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहीणीचे पैसे सरकारजमा!
धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका लाभार्थी महिलेचे पाच महिन्याचे पैसे परत घेण्यात आले आहेत. या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आले होते. अन्य एका योजनेचाही या महिलेने लाभ घेतला होता. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगण्यात आले. यानुसार साडेसात हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडके बहिण योजना ही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली होती. या योजनेसाठी विविध निकष निश्चित करण्यात आले होते.मात्र निवडणूक जवळ आल्याने सर्वच अर्ज सरसकट स्वीकारण्यात आले. त्यावेळी अर्जांची कोणतीही पडताळणी केली गेली नाही. मात्र आता निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय. तशी घोषणाच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.
या योजेनच्या पडताळणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निकषात न बसणाऱ्या अपात्र महिलांना यापुढे योजनेचा फायदा घेता येणार नाही. तसेच निकषात न बसणाऱ्या अपात्र महिलांनी योजनेचा फायदा घेतला आहे अशा महिलांना पैसे पुन्हा सरकार जमा करावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
तथापि, पैसे पुन्हा सरकार जमा करून घ्यायचे होते तर मग आधीच अर्जांची पडताळणी का केली गेली नाही? अशी विचारणा नागरिकांकडून होताना दिसत आहे. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सरकारने सुरुवातीला सरसकट अर्ज स्वीकारले का? असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत.