संग्रहित छायाचित्र
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात आहे. या हत्येप्रकरणाला दिवसागणिक नवं नवं वळण लागत आहे. अशातच वाल्मिक कराडला स्लीप अॅप्निया नावाचा आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या आजाराप्रकरणी कराडने 24 तास मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कारडने स्लीप अॅप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. ऑक्सीजनसारखं मशीन त्याला दररोज लावलं जात. ते चालवण्यासाठी सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची विनंती कराडने न्यायालयाला केली आहे. कराडच्या विनंतीनंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाल्मिक कराड याची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्याची शुगर वाढली. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर कराडला वैद्यकीय चाचणी करुन कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टानं त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.