संग्रहित छायाचित्र
बीड जिल्ह्यातील मस्साजोग संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. मात्र 22 दिवस झाले तरी आरोपी सापडले नसल्याने मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बुधवारी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी ‘जलसमाधी’ आंदोलन केले. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर तीन आरोपी अजूनही फरार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस उलटून गेले तरी तिघे आरोपी अद्यापही सापडलेले नाहीत. त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश बघायला मिळत आहे. ग्रामस्थांनी ‘जलसमाधी’ आंदोलन सुरू केले आहे. आरोपींना फाशी द्या अशा घोषणा ग्रामस्थांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, तहसीलदार आणि पोलीस प्रशासन या तलावाजावळ पोहोचले असून, सीआयडीचं काम सुरू आहे, ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी ग्रामस्थांना केल्याचे सांगितले जात आहे.
मस्साजोगच्या महिला आणि पुरुष ग्रामस्थ संतोष देशमुख यांचा फोटो हातात घेऊन तलावात उतरले आहेत. 31 डिसेंबरला अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांनी पत्राद्वारे कळवले होते. पोलिस तसेच तहसीलदारांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या जलसमाधी आंदोलनात मृत संतोष देशमुख यांचा मुलगा देखील सहभागी आहे. खंडणीच्या प्रकरणात आरोप असलेला वाल्मिक कराड स्वत:हून पोलिसांना शरण आला. मग पोलीस काय करत आहेत असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
काय आहे मस्साजोग प्रकरण?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे.