खुडूस येथे रंगले गोल रिंगण
#सोलापूर
ढगाळ आणि आल्हाददायक वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे खुडूस-पानीव पाटी (जि. सोलापूर) येथे परंपरेप्रमाणे गोल रिंगण रविवारी (दि. २५) पार पडले. हा देखणा रिंगण सोहळा ‘याचि देही’ पाहणाऱ्या लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
सकाळपासूनच वारकरी रिंगण पाहायला जमा झाले होते. परिसरातील भाविकांनी देखील आधीपासूनच गर्दी केली होती. खुडूसला परंपरेप्रमाणे चोपदारांनी रिंगण लावले. नंतर भोपळे दिंडीतील मानकऱ्यांनी निशाण घेऊन धाव घेतली. स्वाराच्या आणि मानाच्या अश्वाने दोन फेऱ्या मारल्यानंतर रिंगण पूर्ण झाले.
आसमंत व्यापून टाकणारा टाळ मृदंगाचा नाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ‘माउली... माउली’ या नादब्रह्माचा जागर करत वारकऱ्यांनी या गोल रिंगणाचा आनंद लुटला. अश्वांच्या नेत्रदीपक दौडीच्या माध्यमातून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथील गोल रिंगण याला पाहण्यासाठी वारकरी आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.
वृत्तसंस्था