दंगलखोरांचे हात छाटले पाहिजे - कडू
#अमरावती
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत घडलेल्या दंगलींना जे जबाबदार असतील त्यांचे हात छाटले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीवेळी घेतली. दंगलीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, दंगल घडवण्यासाठी जे पुढे आले असतील, त्यांचे हात छाटले पाहिजे. दंगल करणारा कुणीही असो… मग तो हिंदू असो वा मुस्लीम असो किंवा अन्य जातीचा असो… ते दंगलखोर आहेत, जे-जे दंगल पेटवण्यासाठी पुढे आले असतील, त्यांचे हात छाटले पाहिजेत. तसेच एका मंत्र्याकडे आठ-आठ खाती असतील तर ते जनतेची सेवा कशी करणार? असा प्रश्न उपस्थित करत कडू यांनी उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष खोचक टोला लगावला.
गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. औरंगाबाद, बुलढाणा, अकोला आणि अहमदनगर येथे दोन समुदायात हिंसाचार घडला आहे. या दंगलीमध्ये काहीजणांना प्राण गमवावा लागला. अलीकडेच अकोल्यातील दंगलीत एकाचा मृत्यू झाला. दंगलीत दोन पोलिसांसह अन्य आठ लोकही जखमी झाले आहेत.
अकोला दंगलीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊन वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू म्हणाले की, राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. दररोज कुणी ना कुणी आत्महत्या करत आहे. औषधं मिळत नाही, म्हणून लोक मरतायत. असं असताना एकमेकांच्या विरोधात कुणी तलवारी काढत असेल आणि शहरातील शांतता भंग करत असेल, तर हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. त्यांच्या विरोधात कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी कारवाई झालीच पाहिजे.
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या वृत्तावर कडू म्हणाले की, एकाच व्यक्तीकडे आठ-आठ खाती असतील तर जनतेची सेवा कशी करणार? कुणाचंही नाव न घेता हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे सहा विभागांचे मंत्री आणि सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीही आहेत, याकडे बच्चू कडूंच्या बोलण्याचा रोख होता, अशी चर्चा सुरू आहे.
कडू म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आवश्यकच आहे. कुणी नाराज होईल, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार थांबवला जात असेल तर ते चुकीचं आहे. शेवटी सरकार हे जनतेच्या सेवेसाठी असतं. एखादा नेता आठ-आठ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असेल किंवा एकाच व्यक्तीकडे आठ खाती असतील तर निश्चितच सेवेला बाधा निर्माण होते. त्यामुळे याचा विचार शिंदे-फडणवीस सरकार केल्याशिवाय राहणार नाही. लगेच आम्हाला पद द्या, असं म्हणत नाही. पण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करा. प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री द्यावा.