चव्हाणांसाठी प्रतापरावांची माघार?

लोकसभेसाठी भाजपकडून खतगांवकरांच्या सुनेला मिळणार संधी; पक्षादेश शिरसावंद्य असल्याची चिखलीकरांची कबुली

RetreatofPratapravoforChavans?

चव्हाणांसाठी प्रतापरावांची माघार?

#नांदेड

नांदेड लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मीनल खतगावकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी शाह यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. त्यांच्या या भेटीनंतर नांदेडच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. डॉ. मीनल खतगावकर या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा आहेत.

मीनल खतगावकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून त्यांच्या नावाची चर्चादेखील सुरू होती. तशी तयारी देखील त्यांनी केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर त्यांचे समर्थक देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांनी देखील पक्ष निरीक्षकांच्या दौऱ्याच्या काही तासांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागच्या आठवड्यात भाजपच्या पक्ष निरीक्षकांनी नांदेड लोकसभेच्या उमेदवाराच्या चाचपणीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नांदेड लोकसभेसाठी डॉ. मीनल खतगावकर यांचे नाव सुचवले होते. शिवाय, काहींनी विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, आमदार राम पाटील रातोळीकर यांचे नाव सुचवले होते.

या बैठकीनंतर तसेच बैठकीपूर्वी खासदार अशोक चव्हाण यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर डॉ. मीनल खतगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे. मंगळवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या देशाचे गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही, मात्र भेटीने नांदेडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, नांदेड लोकसभेसाठी भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील दावेदार आहेत.

नांदेड लोकसभेसाठी भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील उमेदवारी बाबत दावेदारी केली आहे. लोकसभेचा उमेदवार मीच राहणार असे चिखलीकर सुरुवातीपासून ठामपणे म्हणत होते. आता मात्र पक्ष जो निर्णय देतील, त्या भूमिकेशी मी सहमत असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest