सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा; प्रकाश आंबेडकरांचा ओबीसींच्या सुरात सूर
मुंबई : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून पक्षाने दिलेले ११ ठराव मांडण्याचे आणि त्या ठरवाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. या ठरावामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या संदर्भातही काही ठराव घेण्यात आले आहेत. या ठरावात सगेसोयरेबाबत मोठं वक्तव्य करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता जास्त आहे.
शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामधे रक्ताच्या नातेवाईकांची ( वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या ) जात प्रमाणपत्रे हा एक आवश्यक पुरावा असतो. या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचे काम ‘सगेसोयरे’ (रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना) जातप्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे.
आरक्षण कायदा व नियमावलीमधे चुकीची ढवळा ढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशाप्रकारे संविधानाची आरक्षण नीती आणि आरक्षणामागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करताहेत. त्यामुळेच समाजातील सामाजिक सौहार्द आणि बंधुभावाला तडे जात आहेत. जाती समूहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे.
त्यांनाही आंदोलन करण्याचा अधिकार - मनोज जरांगे
वंचित बहुजन आघाडीने जीआर रद्द करण्याची काय मागणी केली ते मला माहीत नाही. मी ते वाचलेही नाही आणि प्रत्यक्ष बघितलेही नाही. त्यांनी जर तशी मागणी केली असेल तर त्यांना लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. कोणाच्या मागणीला साथ द्यायची नाही किंवा द्यायची, याबद्दल आमचे काही दुमत नाही, पण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही मिळवणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी जी मागणी केली त्यावर आम्ही नाराज होण्याचे काही कारण नाही. प्रकाश आंबेडकर यांना नेहमी आम्ही पाठिंबा दिला आणि त्यांनीही आम्हाला दिला आहे. आजही आमचे त्यांच्याबद्दल चांगले मत आहे आणि राहणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आमच्या मनात आजही आदराचे स्थान आहे. त्यांचे स्पष्ट बोलणे मला आवडते. प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासोबत असोत किंवा नसोत, आम्ही त्यांचा नेहमी सन्मान करतो आणि त्यांचे मराठ्यांच्या मनातील स्थान कायम राहणार आहे, अशी भावनाही जरांगे यांनी व्यक्त केली. पूर्वी ओबीसींचे मतदान एक गठ्ठा होते म्हणून राजकारणी त्यांना घाबरत होते, पण आता माझ्या मराठा समाजाचे मतदान एकगठ्ठा आहे. आता मराठे एका बाजूला आहेत. आता मराठा समाज निर्णायक आहे. कुणाला गुलाल पाहिजे असेल तर तो गोरगरीब मराठ्यांच्या हातात आहे. विजयाचा रथ गोरगरीब मराठ्यांच्या हातात आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.