पुण्यातून पाऊस गायब
सीविक मिरर ब्यूरो
महाराष्ट्रातील पुणे शहर तसेच जिल्ह्याकडे पावसाने यंदा चांगलीच पाठ फिरवलेली दिसून येते. मागच्या २१ दिवसांत फक्त शहरात २१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पुण्यामध्ये जून महिन्यात माॅन्सूनपूर्ण आणि माॅन्सूचा मिळून सरासरी ११२.६ मिमी पाऊस पडतो. मात्र, पहिल्या २१ दिवसांत झालेल्या पावसाचा विचार करता यंदा पुण्याला चांगलाच फटका बसलेला दिसतो. या काळात केवळ २१ मिमी पाऊस झाला. सरासरीच्या ८१ टक्के पाऊस या महिन्यात झाला नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात यंदा माॅन्सून पावसाचं प्रमाण सुरुवातीच्या काळात कमी असेल, असं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात जून महिना संपत आला, तरी अद्याप पाऊस नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याची मोठी भीषण टंचाई जाणवू शकते.
जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरी १२०.४० मिमी पावसाची नोंद होते. पंरतु यंदाच्या वर्षी अवघा १५.१० मिमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात माॅन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात ८८ टक्के पाऊस गायब झाला असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांची पिके करपू लागली आहेत. त्याचबरोबर खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाने सगळ्यात जास्त पाठ फिरवली आहे. मागच्या २१ दिवसात फक्त शहरात २१ मिमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे असंदेखील हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. माॅन्सून सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात राहण्याची अपेक्षा होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळमध्ये माॅन्सून येण्यास आठ दिवस उशीर झाला आहे. त्यानंतर अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे माॅन्सून गायब झाला होता.
भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे के. एस. होसळीकर यांनी पुढील चार आठवड्यांचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामध्ये पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह मध्य भारतात चांगला पाऊस होईल. त्याचबरोबर दुसऱ्या आठवड्यात माॅन्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील.
१ ते २१ जून या काळात कोकण आणि गोवा विभागात ६७.६० मिमी (सरासरीच्या ८४ टक्के), मध्य महाराष्ट्र विभागात १३.८० मिमी (सरासरीच्या ८६ टक्के), मराठवाडा विभागात ९.४० मिमी (सरासरीच्या ९० टक्के) आणि विदर्भात ८.५० मिमी (सरासरीच्या ९१ टक्के) पाऊस झाल्याचं हवामान विभागानं नमूद केलं.
वृत्तसंस्था