राहुल यांची यात्रा आज राज्यात

नंदूरबारमध्ये यात्रा भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा नावाने प्रवास करणार, १७ मार्च रोजी मुंबईत समारोप

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Tue, 12 Mar 2024
  • 11:51 am
Rahul'sjourney

राहुल यांची यात्रा आज राज्यात

#नंदूरबार 

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदूरबारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या, मंगळवारी प्रवेश करत आहे. येथून यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासाला होणार आहेत. आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आदिवासींना आपलेसे करण्यासाठी नंदूरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या यात्रेचे नामकरण भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये यात्रेला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सत्ताधारी भाजपचे अधिक लक्ष असणार आहे.  हा यात्रेचा शेवटचा टप्पा असणार असून १७ मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे. 

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नंदूरबारची ओळख निर्माण झाली होती. अनेक लाटांमध्ये काँग्रेसचा हा किल्ला मजबुतीने उभा राहिला. माणिकराव गावित यांच्या माध्यमातून काँग्रेसने तब्बल आठ वेळा नंदूरबार लोकसभेची जागा ताब्यात ठेवली. त्यामुळेच देशातील निवडणूक प्रचाराचा प्रारंभ काँग्रेसने नंदूरबारमधून करून यश संपादन केले. इंदिरा गांधींची प्रचार सभा असेल अथवा शहाद्यातून सोनिया गांधींच्या राजकीय कारकिर्दीचे पदार्पण, किंवा आधारसारखा देशातील महत्त्वकांक्षी पथदर्शी प्रकल्पाच्या लोकार्पणासाठीही काँग्रेसने नंदूरबारची निवड केली होती.

२०१४ च्या निवडणुकीत प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी यांची सभा ऐनवेळी रद्द झाली आणि मोदी लाटेत काँग्रेसचा हा किल्ला ढासळला. नंदूरबार जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलले. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एकदा नंदूरबारमधील सभेतून, नंदूरबारची जागा जेव्हा भाजप जिंकेल, तेव्हाच देशात भाजपची एकहाती सत्ता येईल, असे भाष्य केले होते. २०१४ पासून नंदूरबारच्या जागेवर भाजपच्या डॉ. हिना गावित यांचे वर्चस्व आहे. मोदींचा करिष्मा आणि डॉ. गावित परिवाराची राजकीय ताकद, यातून भाजपने गेल्या १० वर्षात जिल्ह्यात आपली पाळमुळे घट्ट केली आहेत.

दुसरीकडे, ज्या नंदूरबार जिल्ह्यावर गांधी घराण्याचे विशेष प्रेम राहिले, त्या नंदूरबारकडे २०१० नंतर गांधी घराण्याचा एकही सदस्य फिरकला नाही. तब्बल १४ वर्षांनंतर राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून नंदूरबारमध्ये दाखल होत असल्याने आदिवासी समाजात मोठी उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा नंदूरबारमध्ये दाखल होत असल्याने काँग्रेसला उभारी आली आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यात गांधी घराण्याविषयी असलेले आकर्षण कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने थेट या यात्रेचे नाव बदलून नंदूरबारमध्ये भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असे नामकरण केले आहे. आदिवासी बांधवांना पुन्हा काँग्रेसकडे खेचण्यासाठी ही खेळी खेळली आहे.

१० वर्षात मोदी सरकारने कशा पद्धतीने आदिवासी बांधवांचे शोषण केले, धनदांडग्यांना कसा लाभ मिळाला, हे यात्रेतून दाखविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. ही कुठलीही राजकीय फेरी अथवा सभा नसल्याचे नेत्यांकडून स्पष्ट केले जात असताना दिल्ली, राज्यातील बडे नेते त्याच अनुषंगाने सर्व तयारी करताना दिसत आहेत.वृत्तसंंस्था

सुरक्षा वाढीची मागणी 

राहुल गांधी यांच्या यात्रेच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांनी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांनी यात्रेला दिल्या जाणाऱ्या पोलीस संरक्षणात वाढ करावी, अशी मागणी केली. इंडिया आघाडीतील घटक पक्षही या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले, १२ ते १७ मार्च या काळात भारत जोडो यात्रेचा शेवटचा टप्पा असेल. या टप्प्यात इंडिया आघाडीचे इतर घटक पक्ष यात्रेत सहभागी होतील. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी ( शरद पवार गट) हे इंडिया आघाडीतील महत्त्वाचे पक्ष आहेत. गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला महाराष्ट्रात मोठे धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यावर राष्ट्रवादीत दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या यात्रेला चांगलेच महत्त्व आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest