पोलिस भरतीत वयोमर्यादा मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दंडवत आंदोलन !
पुणे : राज्यभरात आजपासून १७ हजार ४७१ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाने भरती प्रक्रियेचे नव्याने परिपत्रक जाहीर केले असून या पत्रकातील निकषांबाबत उमेदवारांनी आक्षेप घेतले आहे. या संदर्भात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशी (दि.१९ जून) उमेदवारांनी दंडवत आंदोलन केले.
राज्य शासनाने पोलीस भरतीबाबत नविन नियमावली केली आहे. त्यानुसार प्रमुख मागणीनुसार पोलीस भरतीचे वय वाढवून मिळावे, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) उमेदवारांना देण्यात येणारे अतिरीक्त गुण देऊ नये, त्या ऐवजी त्यांना राखीव जागांमधून त्यांची भरती करावी. अशा अनेक मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत भरती प्रक्रियेतील निकष दूर करावे अन्यथा भरती प्रक्रिया रद्द करावी अशा आशयाच्यो घोषणा देत आंदोलन केले.
रितेश पाटील, उमेदवार म्हणाले," पोलीस भरतीच्या परिपत्रकामध्ये उमेदवारांना वयाची मर्यादा पूर्वी जेवढी होती तेवढीच ठेवण्यात आली आहे. परंतु, सन २०२०-२२ काळात कोरोना प्रादूर्भावामुळे भरती प्रकिया राबविण्यात आली नाही. त्यानंतर थेट २०२४ मध्येच भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने २०२२ मधील पात्र विद्यार्थ्यांना भरतीपासून वंचित रहावे लागत आहे. माझ्यासारख्या अनेक उमेदवारांचे पोलीस दलात काम करण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत वय वाढवून मिळावे अशी मुख्य मागणी आहे."