Lawyer Couple Murder: आंदोलक वकिलांचा गेटवर धावा, पाण्याच्या बाटल्या फेकल्या

अहमदनगर: राहुरीमध्ये खून झालेल्या आढाव वकील दाम्पत्याच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, आरोपींविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

आंदोलक वकिलांचा गेटवर धावा, पाण्याच्या बाटल्या फेकल्या

नगरमधील घटना, वकील दाम्पत्याचा खून झाल्याने वातावरण तापले

अहमदनगर: राहुरीमध्ये खून झालेल्या आढाव वकील दाम्पत्याच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, आरोपींविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य गेट बंद असल्याने वकील आक्रमक झाले होते. महिला वकिलांसह अनेक वकील गेटवर चढले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने बाटल्यांचा मारा केला. मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार संग्राम जगताप सहभागी होते.

महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा करावा, राहुरीतील गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयापुढे चालवावा, खटला चालवण्यासाठी सरकारतर्फे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा मागण्याही आंदोलक वकिलांनी केल्या.

राहुरीतील मानोरी गावामधील वकील राजाराम आढाव व पत्नी मनीषा आढाव यांचा पंधरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला. आढाव दाम्पत्याचे पक्षकार असलेली व्यक्तीच गुन्ह्याची सूत्रधार असल्याचे आढळले. खुनाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) यापूर्वीच वर्ग केला आहे. तत्पूर्वीच स्थानिक पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. मात्र वकील संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाभरातील वकिलांनी आंदोलन पुकारले होते. शुक्रवारी जिल्ह्यातील वकिलांनी मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेव्हा कार्यालयाच्या गेटवर गोंधळाचे वातावरण होते. पोलीस अल्पसंख्येने उपस्थित होते. सर्व वकिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळावा म्हणून वकील आक्रमक झाले होते. महिला वकिलांसह अनेकजण गेटवर चढले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. नंतर पोलिसांनी तातडीने प्रत्येक तालुक्यातील वकील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घडवून आणली. वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले. आमदार सत्यजित तांबे यांनीही मोर्चेकरी वकिलांची भेट घेतली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest