जुगार अड्डयांविरोधात आंदोलन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा
#छत्रपती संभाजीनगर
जुगार अड्डे बंद करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ते अड्डे बंद करण्याऐवजी आंदोलकावरच विनयभंगाचा गुन्हादाखल केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे.
जुगार अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी शहरात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांनी जुगार अड्डे बंद करण्याऐवजी चक्क आंदोलकावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रमेश पाटील असं विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकाचं नाव आहे.
रमेश पाटील हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत, ते जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करत असतात. शहरातील जुगार अड्डे बंद व्हावे, या मागणीसाठी रमेश पाटील यांनी महापालिका गेटसमोर अर्धनग्न आंदोलन केलं होतं. तिथे त्यांची धरपकड झाली. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रमेश पाटील यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात घुसून आपल्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांच्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे रमेश पाटील यांचे आंदोलन अधिकच चर्चेत आले आहे. दुसरीकडे, आंदोलनावेळी अश्लील हावभाव केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात रमेश पाटील यांच्या कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. पाटील यांनी समाजाच्या समस्येसाठी आंदोलन केलं, मात्र त्यांच्यावरच विनयभगांचा गुन्हा दाखल करण्यात आला, हे संविधानाला धरून नसल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबानं दिली आहे.
वृत्तसंस्था