फडणवीसांच्या घरासमोर विदर्भवाद्यांचे आंदोलन

ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बुधवारी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन केले. नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 10 Aug 2023
  • 11:46 am
फडणवीसांच्या घरासमोर विदर्भवाद्यांचे आंदोलन

फडणवीसांच्या घरासमोर विदर्भवाद्यांचे आंदोलन

स्वतंत्र विदर्भ, महागाई, बेरोजगारीच्या मुद्यावर समिती आक्रमक; आंदोलकांना रोखल्याने वाढला संताप

#नागपूर

ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बुधवारी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन केले. नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. आंदोलनाची सुरुवात संविधान चौकातून झाली. येथून आंदोलक व्हरायटी चौकातून अमरावती मार्गाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाकडे निघाले. पोलिसांनी आंदोलकांना अमरावती मार्गावरील हाॅकी ग्राऊंड परिसरात रोखले. त्यानंतर आंदोलक संतप्त झाले. येथे आंदोलकांनी सरकार व ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले सुरक्षा कठडे ढकलून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी काही विदर्भवादी आंदोलकांना ताब्यात घेतले. फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वेगळे विदर्भ राज्य ही  आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच वीज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारले. विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत, त्यासोबतच नव्यानेही प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, विदर्भातील जनतेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उलट औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भवाद्यांचा विरोध आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest