संग्रहित छायाचित्र
भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टिका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. सुरुवातीला धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर प्राजक्ता हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. अखेर सोमवारी, आमदार सुरेश धस यांनी घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर प्राजक्ता माळी हिच्याकडून देखील या प्रकरणावर पडदा टाकला गेला आहे.
प्राजक्ता माळी काय म्हणाली?
"सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार, संबंध महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्यापासून ते आतापर्यंत माझ्या कुटुंबीयांना अनेक मेसेज आले. महिलांच्या सन्मानासाठी सर्व स्तरांतून आवाज उठवला गेला. मला पाठिंबा दिला गेला, यामुळे आम्हाला बळ मिळालं…समाधान वाटलं. खूप खूप धन्यवाद! याशिवाय आमदार सुरेश धस यांचेही मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिलावर्गाची माफी मागितली. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, दादा खूप धन्यवाद. यामुळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंत. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळेजण जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे त्यांचे विचार सदैव इथे असतील हे तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे.”
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. त्यांनी यात जातीने लक्ष घातलं. अत्यंत निगुतीने आणि संवेदनशीलतेने त्यांना हा विषय पुढे नेला, मार्गी लावला. त्याचबरोबर महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे देखील आभार. माध्यमांनी हा विषय हातळताना संवेदनशीलता दाखवली. त्याबद्दल त्यांचे देखील आभार. "
"गेल्या दोन दिवसांपासून आणखी दोन मुद्दे आणखी चर्चिले गेले. सुरेश धस हे बोलले त्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यावी लागली, असे मी पत्रकार परिषदेतच नमूद केले होते. ते बोलले नसते तर मी तुमच्यासमोर नसते. कुठलाही आंदोलनाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा माझा हेतु नव्हता. माझ्या मार्फत दुसऱ्या कोणाचाही हा हेतु नव्हता. हे मी स्पष्ट करू इच्छिते. कोणीही यातून गैरअर्थ काढू नये."
"संतोष देशमुख यांच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्र हळहळला. ती घटना अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी याच मताची मी आहे. संबंध महाराष्ट्राचं हेच मला असल्याची मला खात्री आहे. कलाकारांचे काम सामाजिक प्रतिमेशी निगडीत आहे. मात्र सोशल मिडियावर व्यक्त झाल्यास कलाकारांचे ट्रोलिंग केले जाते. त्या ट्रोलिंगच्या सुद्धा बातम्या केल्या जातात. म्हणून कलाकरांनी असल्या घटनांबाबत व्यक्त होणे बंद केले आहे. ट्रोलिंग बंद झाल्यास सगळेच कलाकार सगळ्या गोष्टींबद्दल मत व्यक्त करतील याची खात्री आहे."
"अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडिया आणि युट्यूब चॅनेल्स मोकाट आहेत. यात काही नियमावली असावी अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारपासून सगळेच याबाबत विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. काहीतरी मार्ग काढून त्यांच्यावर कारवाई करता येईल असा प्रयत्न आहे. मलाखात्री आहे, मुख्यमंत्री फडणवीस संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करतीलच. तसेच सोशल मीडियाबाबत कठोर नियम आणतीलच याची मला खात्री आहे."
"मी याठिकाणी एक गोष्ट नमूद करते की, आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. मी करु इच्छित नाही. आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकतेय."
आमदार सुरेश धस काय म्हणाले होते?
"मी प्राजक्ताताई माळींबाबत जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत काही बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेलतर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो."