संग्रहित छायाचित्र
रोहित आठवले
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ने फटकारल्यानंतर राज्यातील १३० पैकी ६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Police) मधील १३ आणि पुणे शहर (Pune Police) मधील २ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या इतर घटकांमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याबाबत अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतली होती. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाचा सोयीस्कर आणि हेतूपुरस्सर अर्थ काढून आमच्या बदल्या करण्यात आल्याची कैफियत राज्यातील अनेक पोलीस निरीक्षकांनी मॅट मध्ये मांडली होती. (Maharashtra Administrative Tribunal)
तीन वेळा याबाबत सुनावणी झाल्यावर मॅटने स्वतः हून याबाबत निवडणूक आयोगाला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला होता. तसेच पोलीस महासंचालक कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयाने केलेल्या बदल्या परिपत्रकात दिलेल्या निकषानुसार आहेत का याची विचारणा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने केली होती. त्यानंतर निवडणूक आयोग आणि महासंचालक कार्यालय तसेच राज्यातील अनेक पोलीस आयुक्त कार्यालयातून आलेल्या स्पष्टीकरणावर निकाल देत मॅटने राज्यातील १३० पैकी ६५ निरीक्षकांच्या बदल्या रद्द ठरविल्या आहेत. (MAT police transfer)
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटक प्रमुखांकडून बदलीपात्र पोलीस निरीक्षकांची माहिती मागवण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांची त्यांच्या घटकातून इतर घटकात बदली करण्यात आली होती. या बदली आदेशाच्या विरोधात काही पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली.
मॅटने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बदली आदेशाची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २१ फेब्रुवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित घटक प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर पुणे शहर (२), पिंपरी-चिंचवड (१३), ठाणे शहर (७), विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र (१) अशा एकूण २३ पोलीस निरीक्षक जे २१ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित घटकात कार्यकारी पदावर कार्यरत होते, त्यांना आयोगाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्याबाहेर बदली करण्यापासून सवलत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महासंचालक कार्यालयाकडून देखील ४२ पोलीस निरीक्षकांची बदलीबाबत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एकूण ६५ पोलीस निरीक्षकांची बदली रद्द करण्याचे आदेश दिले. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
बदली रद्द झालेले पिंपरी-चिंचवड शहर दलातील पोलीस निरीक्षक – शंकर डामसे, शैलेश गायकवाड, शंकर बाबर, ज्ञानेश्वर साबळे, दिपाली धाडगे, प्रसाद गोकुळे, सुनील पिंजण, विश्वजित खुळे, बाळकृष्ण सावंत, दीपक साळुंखे, शहाजी पवार, अरविंद पवार, अनिल देवडे.
ठराविक अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आमच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या नियमाला धरून नव्हत्या. आम्ही आमचे म्हणणे मॅटमध्ये मांडल्यावर आम्हाला न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रया एका निरीक्षकाने दिली.