पंकजा मुंडे यांच्या विधानाने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण
#मुंबई
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मी भाजपची, पण भाजप पक्ष माझा नाही, असे विधान जाहीर कार्यक्रमात केल्याने पुन्हा एकदा राजकीय तर्क-वितर्काना उधाण आले आहे. पंकजा मुंडे भाजपचा त्याग करणार का? पंकजा मुंडेंच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा कोणती असणार?, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केलेल्या विधानाने अशा चर्चांना खतपाणी घातले आहे. पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असे देशमुख म्हणाले आहेत.
अनिल देशमुख यांना याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, पंकजा मुंडे काय बोलल्या तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या नाराजीचा विषय हा भाजपचा प्रश्न आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल.
पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश द्यायचा की नाही याबाबत बीडमधील नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली जाईल. पंकजा मुंडेंबाबतचा अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच घेतील.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याने भावी खासदार म्हणून पोस्टरबाजी सुरू केली आहे. त्यामुळे शिरूरमधून खासदार अमोल कोल्हे यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता आहे. अशात अमोल कोल्हे हेदेखील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. यावर अनिल देशमुख म्हणाले, अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी भाजपची आहे. मात्र भाजप पार्टी थोडीच माझी आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.