संग्रहित छायाचित्र
बदलापूरच्या घटनेनंतर शालेय स्तरावरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहांसह होस्टेलमध्ये पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. हे बटन दाबल्यानंतर जवळच्या ठाण्यातील पोलीस शाळेत पोहोचतील. बदलापूर येथील शाळेत एका सफाई कामगाराने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर महिला आणि बालविकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने आपला अहवाल केसरकर यांना सादर केला आहे. त्याआधारे राज्यातील सर्व शाळांमध्ये पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बटनचे नियंत्रण शाळा आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या देखरेखीखाली असेल. पॅनिक बटणावरून पोलिसांना अलर्ट मिळाल्यास पोलीस घटनास्थळी पोहोचतील. बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारनेही एका समितीची स्थापना केली असून यासंबंधी अहवालावर बुधवारी (दि. २८) चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहितीही केसरकर यांनी दिली.
केसरकर पुढे म्हणाले, ‘‘बदलापूर घटनेप्रकरणी एकत्र समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आयोगाच्या अध्यक्ष, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि आयजी यांना विशेष मार्गदर्शक म्हणून बोलावलं आहे. याचा सविस्तर अहवाल मंगळवारी (दि. २७) प्राप्त होणार असून त्यावर बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे. कॅबिनेटमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली आहे. एकंदर निर्णय नंतर जाहीर करू.’’
असे काम करणार पॅनिक बटन
महिला आणि मुलींनी अडचणीत असल्यावर पॅनिक बटण दाबले तर नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ माहिती पोहोचेल आणि त्यानंतर ट्रॅकिंग सिस्टममुळे संबंधित व्यक्ती कुठे आहे, हे पोलिसांना समजेल. हैदराबादमधील एका कंपनीने हे बटण तयार केले असून ही सिस्टीम ऑफलाइनही चालते. त्यामुळे भविष्यात अशा घटनांवर नियंत्रण येईल, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.