आमचे त्रिशूळ पूर्ण झाले!
राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शनिवारी (दि. ८) गडचिरोलीमध्ये उपस्थित होते. या तिघांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह, निवासी शाळा, पीडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू आणि पोलीस विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे रिमोट दाबून उद्घाटन करण्यात आले. गडचिरोलीत पोहोचताच शिंदे, फडणवीस आणि पवार यांचे पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी तिघांच्याही डोक्यावर पारंपरिक आदिवासी मुकूट घालण्यात आला.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रथमच आज सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र सहभागी झाले होते. ‘‘अजित पवार आमचे जुने साथी आणि मित्र आहेत. ते आता एकनाथ शिंदे आणि आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्याने आमचे त्रिशूळ पूर्ण झाले आहे. आमचे त्रिशूळ हे विकासाचे आहे. हे त्रिशूळ राज्याची गरिबी दूर करेल. अजित पवार सोबत आल्याने राज्याच्या विकासाच्या गतीला अधिक वेग येणार आहे,’’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.