कॉलेज कॅन्टीनमध्ये दिला तोंडी तलाक!
#नवी मुंबई
कामाच्या ठिकाणी पत्नीला तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने तक्रारीत दावा केला आहे की, तिच्या पतीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खारघरमधील एका महाविद्यालयात सहकाऱ्यांसमोर तिला तिहेरी तलाक दिला होता. यावेळी आरोपीसोबत एक इस्लामिक धर्मगुरू आणि दोन वकील
साक्षीदार होते.
खारघरमधील एका महाविद्यालयात पीडित महिला लिपिक म्हणून काम करते. अल्ताफ मुबारक अत्तार, असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मुस्लीम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा, २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घडलेली होती, महिलेने गेल्या गुरुवारी या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधत पतीविरुद्ध तक्रार केली. आरोपी अल्ताफ मुबारक अत्तार याचे १७ वर्षांपूर्वी पहिले लग्न झाले होते. त्याला पहिल्या लग्नातून १५ आणि १३ वर्षांची मुले आहेत. १० वर्षांपूर्वी आरोपीने दुसरे लग्न केले. अलीकडेच खारघरमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करणाऱ्या पीडित पत्नीला पतीला दुसरी पत्नी असल्याचे आढळून आले.
याबाबत तिने पतीला जाब विचारल्यावर, त्याने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली, त्यानंतर त्याने नवी मुंबई पोलिसांच्या महिला कक्षात याची तक्रार केली जिथे दोघांचे समुपदेशन केले जात आहे. दरम्यान, गतवर्षी ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास पत्नी आपल्या सहकाऱ्यांसोबत संध्याकाळचा चहा घेत असताना पतीने दोन इस्लामिक धर्मगुरूंना पत्नी काम करत असलेल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आणले. पतीने तिच्या पत्नीकडे बोट दाखवले आणि मौलवींना सांगितले की, ती त्याची पत्नी आहे आणि तो साक्षीदार म्हणून तिच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत तिला तलाक देत आहे. पुढे आरोपीने पत्नीला तीनदा 'तलाक' उच्चारत तलाक दिला, असे खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी सांगितले.