संग्रहित छायाचित्र
मुंबई: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाल्यावर निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचा दावा केला जात आहे. त्यातच भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसबरोबरच ठाकरे गटाचेही आमदार फुटल्याचा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आशिष शेलार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात अन्य कोणत्याही पक्षाला स्थान मिळू नये, अशी ठाकरे गटाची कार्यपद्धती आहे. एकीकडे लोकशाहीच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे लोकशाही विरोधात काम करायचं, अशी ठाकरे गटाची भूमिक आहे. याची अनेक उदाहरणं मागच्या काही दिवसात पुढे आली आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना मदत केली नाही. मुंबईत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांना पाडण्याचे काम केलं. आता शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवामागेही ठाकरे गटाचा हात आहे. विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे दोन आमदार फुटले. निवडणुकीत भाजपाकडे मित्रपक्ष मिळून ११० आमदार होते. मात्र, आम्हाला ११८ मते मिळाली. शिंदे गटाकडे एकूण ४७ मते होती. मात्र, त्यांना ४९ मते मिळाली. अजित पवार गटाकडे एकूण ४२ मते होती. मात्र त्यांना एकूण ४७ मते मिळाली. याचा अर्थ महायुतीला एकूण १५ मते जास्तीची मिळाली. यापैकी सात मते काँग्रेसची फुटली असं मानले तरी बाकी ८ मते कोणाची होती ? या आठ मतांमध्ये ठाकरे गटाची दोन मते होती. याची आम्हाला १०० टक्के खात्री आहे.
यावेळी आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिलं. या निवडणुकीत भाजपाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याबाबत ते म्हणाले, संजय राऊत हे खोटी माहिती पसरवण्याचे बादशहा आहेत.
आमच्य माहितीनुसार ठाकरे गटाने त्यांच्या आमदारांना पैसे वाटले. तरीही त्यांची दोन मते का फुटली, याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं.
पवार गटाची सारी मते मिळाली नाहीत - जयंत पाटील
शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची ७ मतं फुटल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचा दावा ठाकरे गटानं केला आहे. त्याबाबत जयंत पाटील यांनी शरद पवार गटाची पूर्ण १२ मतं आपल्याला मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांना १२ मतं मिळाली. ही १२ मते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या १२ आमदारांची असल्याचा अंदाज होता. त्यामुळे शरद पवार गटानं आपली पूर्ण ताकद त्यांच्या पाठिशी उभी केल्याचे सांगितलं गेलं. आता खुद्द जयंत पाटील यांनीच शरद पवार गटाची सर्व बारा मतं आपल्याला मिळाली नसल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले, मी पराभवाचं आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण आधी नव्हतं. थोडेफार इकडे-तिकडे व्हायचं. मी निवडणुका लढवल्या, तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असं घडत असेल तर जनतेनं दोन्ही सभागृहं कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मी राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होतो. त्यातले एक मत फुटले. आमचीही मते फुटली. मला जर चार मतं मिळाली असती, तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत मी २५ ते ३० मतं आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होते. आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली मते फुटली तर राष्ट्रवादीच्या एका मताचं काय घेऊन बसलात, असेही ते म्हणाले.
काँग्रेसनं जर दुसऱ्या पसंतीची मतं समान वाटली असती किंवा जर पहिल्या पसंतीची काही मतं दिली असती तर निकाल बरोबर लागला असता. मी १४ मते घेऊनच निवडणूक लढलो होतो. पण हे नाटक बदललं आहे. मी यावर बोलेन. पण मलाही याचा अभ्यास करावा लागेल. या निवडणुकीत मतदारांवर इतर गोष्टींचा एवढा प्रभाव होता की ते काहीच करू शकले नाहीत. पहिली पसंती, दुसरी पसंती याचा मी अभ्यास केलेला नाही. राष्ट्रवादीचं एक मत फुटलं. आमचं एक मत मला मिळाले, असेही ते म्हणाले. दरम्यान, पराभवामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीवर नाराज असून ते आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण जयंत पाटील यांनी ती शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, आपली भूमिका निश्चित आहे. आम्ही मविआसोबत आणि शरद पवारांसोबत आहोत, हे निश्चित आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही.