संग्रहित छायाचित्र
पुण्यासह राज्यभरात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात आली. परंतु, मोठा गाजावाजा करीत घोषणा केलेल्या एक राज्य एक गणवेश म्हणजेच ‘वन स्टेट वन स्कूल युनिफॉर्म’ या योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली, पण, नवे गणवेश मिळाले नाहीत, यामुळे राज्यातील ४५ लाख विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. प्राथमिकपासून ते माध्यमिक शाळांचा नव्या शैक्षणिक वर्षातील शनिवारी (दि. १५) पहिला दिवस होता. जिल्हा परिषदेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेत उत्साहाने स्वागत केले.
परंतु, राज्य शासनाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना एक नियमित स्वरूपाचा तर दुसरा गणवेश स्काऊट व गाईड यासाठी मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असताना पहिल्या दिवशी मात्र नव्या गणवेशापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.
बचतगटांना शिलाईचे काम
राज्य शासनाच्या निर्णयानुसार सहावी ते आठवीमधील सर्व मुलींना सलवार, कमीज आणि दुपट्टा असा गणवेश पुरवठा केला जाणार आहे. उर्दू शाळांतील मुलींनाही असाच गणवेश असेल. याचबरोबर राज्य शासनाद्वारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजेही पुरविण्यात येणार आहे. याबाबतचा निधीदेखील शाळा व्यवस्थापन समितीला प्रदान केला जाणार आहे. गणवेशाचे स्थानिक बचतगटांकडून शिलाईचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना एकूण ७ लाख २० हजार ५६५ पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठीचे मोफत गणवेश अद्याप मिळालेले नाहीत.
- संजय नाईकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद