आता बायोगॅस प्रकल्पामधून मिळवा शुद्ध पाणी
पुणे : ऐन फेब्रुवारी महिन्यात उकाडा वाढू लागला असून आता पासूनच पाणी टंचाईच्या झळा लागू लागल्या आहेत. अशावेळी 'आपण पाणी तयार करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं', असा विचार नकळत मनात येवून जातो. पण आता खरंच पाणी तयार करणं शक्य आहे. बायोगॅस प्रकल्पात थोडेसे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञात पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसीत केले असून आज त्यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सायडल कंपनीचे सी ई ओ दीपक जयवंत, उद्योजिका रोहिणी खारकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष, स्थापत्य अभियंता श्रुणाली आपटे, सीओईपी पुणे मधील अभियंता सुभाष गुप्ते, आयआयटी मुंबईचे वैमानिक अभियंता आणि कल्याणी ब्रेक्स पुणेचे अध्यक्ष मिलिंद पालकर, केमिकल इंडस्ट्री प्रोफेशनल.डॉ मनोज खारकर, सासा सायडल उत्पादन प्रमुख भाऊसाहेब कंड्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या संशोधानाची माहिती देताना मुखर्जी म्हणाले, ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात. मात्र याच प्रकल्पामधून उर्जे बरोबरच आपल्याला पाणीही मिळू शकते. बायोगॅस हे एक हायड्रोकार्बन आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असतो. आपण जेव्हा बायोगॅस पेटवतो तेव्हा ठरावीक तापमानानंतर यातील हायड्रोजन ऑक्सीजनच्या संपर्कात येवून (H2O) पाणी तयार होते. अन् वाफेच्या रूपात वर उडून जाते. अशा वेळी चिमणीच्या तोंडाशी हे Water recovery unit वापरल्यास नागरिकांना पिण्या योग्य चांगले पाणी मिळू शकते. 1 किलो बायोगॅस पासून 2 लीटर पाणी तयार होवू शकते,असा दावा शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी केला आहे.
पुढे बोलताना पार्थसारथी मुखर्जी म्हणाले, हे एक सिद्ध झालेले तंत्रज्ञान असून उत्तर अमेरिकेत 48 वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच 2003 मध्ये या तंत्रज्ञानाच्या शोधासाठी मला राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळाले आहे. सरकारची एक योजना आहे 'नॅशनल बायोगॅस मॅनेजमेन्ट प्रोग्राम' या अंतर्गत संपूर्ण देशभरात 10 लाख बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. त्यापैकी काही प्रकल्प सुरू देखील झाले आहेत. मात्र, आगामी प्रकल्प उभारताना जर सरकारने हे Water recovery unit त्यात बसवल्यास ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच हे उपक्रम तयार करण्यासाठी उद्योग उभा केल्यास ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होईल. शिवाय या उपकरणाला मेंटेन्सची गरज नाही.
हे तंत्रज्ञान मोठे उद्योग समूह, भाजी मंडई व मोठ्या बायोगॅस प्रकल्पासाठी फायदेशीर आहे. जेव्हा एखादया उद्योग समूहात बायोगॅस प्रकल्प उभारला जातो तेव्हा त्याचा ROI तपासाला जातो; पण हे Water recovery unit बसवल्यास त्याचा ROI आणखी सुधारतो. तसेच कार्बन क्रेडिट बेनिफिट देखील मिळतो, असे ही मुखर्जी यांनी सांगितले.
अनेकदा पाण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात बोअरवेल लावले जातात. यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमी होते. शिवाय पाणी काढण्यासाठी विजेचा खर्च योतोच अन् कालांतराने पाण्याची गुणवत्ता देखील बिघडते. मात्र बायोगॅस पासून पाण्याची निर्मिती केल्यास, अशी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग केल्यात देशातील पाण्याचा प्रश्न येत्या 3 वर्षात पूर्णपणे संपून जाईल, असा विश्वास देखील पार्थसारथी मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केला.