संग्रहित छायाचित्र
केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंगळवारी संसदेत बँकेसंदर्भात एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये भारतातल्या सर्व बँकांमध्ये दर शनिवारी सुट्टी घोषित करण्यासंदर्भात मागणी केली आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला फक्त ५ दिवसच काम करण्याचा प्रस्ताव बँकांनी मांडला आहे. हा प्रस्ताव आयबीएने मांडला असल्याचं अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी सांगितलं आहे. (Bank Holidays)
भारतातील सर्व बँकांसाठी सरकारने २०१५ मध्ये एक नवीन नियम लागू केला होता. ज्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना महिन्यातील २ शनिवारी सुट्टी देण्याचा समावेश होता. तेव्हापासून देशातील सर्व बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. ही सुट्टी अनिवार्य असून ती सार्वजनिक ते देशातील खाजगी क्षेत्रातील सर्व बँकांना लागू होते.
बँकिंग क्षेत्रात 1.5 करोडहून अधिक कर्मचारी काम करतात. अशात अनेक दिवसांपासून आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी समोर येत आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात बँकांकडून ही मागणी करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी हा मुद्दा अनेकदा मांडला होता. अशात भारतातल्या सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि आयबीएच्या सदस्यत्वाखालील अखिल भारतीय वित्तीय संस्थांनीही आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी केली होती.