आता अजित पवार टार्गेट?
बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. या मतदार संघातून उपमुख्यमंत्री अजित पवार( Ajit Pawar यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. या आधी २०१९ मध्ये मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. तर आता पुढील काळात बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांना टार्गेट करण्यात येणारआहे का, असा पश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
त्याला कारणही तसेच आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयाची माहिती देताना शरद पवार यांनी थेट बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या मतदानाची आकडेवारी समोर ठेवली. इतकेच नाही तर मला बारामतीतील जनतेची मानसिकता मला माहिती असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवार यांना थेट इशाराच दिला असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयंत पाटील यांच्या नेतृत्वात चांगले यश प्राप्त केले आहे. आम्ही लढलेल्या एकूण जागांपैकी सात जागांवर आम्ही विजयी होत असल्याचा दावादेखील शरद पवार यांनी केला. दहा जागा लढवल्यानंतर सात जागी विजय मिळवला, हा आमचा चांगला स्ट्राईक रेट असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मताधिक्य वाढले आहे. हे केवळ एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे यश नाही तर हे महाविकास आघाडीचे संयुक्त यश असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या मेहनतीचे हे यश असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.यापेक्षा वेगळा निकाल लागेल] असे मला कधीही वाटले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात मी 60 वर्षापासून काम करतोय. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच तेथून झाली आहे. त्या मतदारसंघातील सामान्य माणसाची मानसिकता काय आहे, हे देखील मला सांगता येते. बारामतीचा मतदार हा योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होती. केवळ बारामती विधानसभा मतदारसंघातून हजारांपेक्षा पेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळाले आहे, असे म्हणत शरद पवार यांनी थेट अजित पवार यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी आव्हान दिले.
विधानसभा एकत्रित लढवणार...
महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रितपणे मेहनत करून ही निवडणूक जिंकली आहे. आम्ही विधानसभेला एकत्र सामोरे जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकसभेचा हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे. आम्ही आमचे काम सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.