संग्रहित छायाचित्र
बदलापुर पूर्व येथील एका नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेनंतर बदलापूर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं. आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी आंदोलक करत आहेत. या सर्व प्रकारावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, बदलापूर मध्ये जी घटना घडली आहे. अशा प्रकारच्या घटना देशात वारंवार घडत आहेत. आपल्याकडे एक अशी पद्धत सुरू झाले आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. माझं मत असं आहे की, एका बाजूला आपण लाडकी बहीण योजना आणत असताना त्या बहिणीच नव्हे तर छोट्या-छोट्या मुलीदेखील आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहे. देशात कुठेही अशा प्रकारची घटना घडता कामा नये. या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी.
आपल्याला अनुभव आहे की दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं. निर्भयाचे सर्व आरोपी पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली. मात्र किती वर्षांनी त्यांना फाशी दिले गेले? या सर्व दिरंगायला जबाबदार कोण? एखाद्या महिलेवर अत्याचार करणारे गुन्हेगार त्या घटनेसाठी जबाबदार असतात. तसंच त्याचा न्यायनिवाडा करून शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे देखील जबाबदार धरले पाहिजे. हे जर झालं तर आणि तरच अशा गोष्टींना बसेल, असं ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढं म्हणाले, सगळे जण पक्षभेद आणि जात - पात भेद विसरून एकत्र आले तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील. तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला माझी लाडकी बहीण आहे.
मला असं कळलं की ही शाळा भाजपाच्या लोकांशी संबंधित आहे. मी याच्यात राजकारण आणत नाही. याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला मग तो भारतीय जनता पार्टीचा जरी असला तरी विनाविलंब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर हे भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडून निबंध लिहून त्यांना सोडून देणार आहात का? कोणत्याही राजकारण न करता कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.