विरोधी पक्षनेतेपदात रस नाही...
#मुंबई
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षांतर्गत भाकरी फिरवल्यानंतर या पक्षाचे फायरब्रॅण्ड नेते अजित पवार आता ॲॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ‘‘विरोधी पक्षनेतेपदात मला रस नाही. त्यामुळे या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे,’’ अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठी मागणी केली आहे. ‘‘विरोधी पक्षनेतेपदात इंटरेस्ट नाही. मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या,’’ अशी जाहीर मागणीच अजित पवार यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काॅर्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या आग्रहास्तव तो मागे घेतला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोघांना कार्याध्यक्षपद देण्यात आले. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४वा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. या पक्षाचे महत्वाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेतेपदात रस नाही. मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी जाहीर मागणीच पक्षाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात केली. यावर आता शरद पवार काय निर्णय घेतात, याबाबत राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
नव्या चेहराला विधानसभा, लोकसभा निवडणुकीत संधी द्यायची आहे. विरोधी पक्षनेतेपदात मला इंटरेस्ट नाही. मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनांची जबाबदारी द्या, अशी जाहीर मागणीच अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांची प्रदेश अध्यक्ष होण्याची इच्छा असून ते विरोधी पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरात आहे. यातूनच त्यांची संघटनामध्ये मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेले विधान चर्चेत आहे. त्यात शरद पवारांनी १० जूनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली. त्यासोबतच जितेंद्र आव्हाडांनाही राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांचे प्रभारीपद सोपवले. आता खासदार सुनील तटकरे यांनाही पवारांनी मोठी जबाबदारी दिली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेल्या मागणीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाल्याचे चित्र आहे. वृत्तसंस्था