मनोज जरांगे पाटील
‘सरकारने घेतलेला एकही निर्णय (Maratha Reservation) आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. त्यामुळे रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही, तर मी जलत्याग करणार आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा’, असे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील म्हणाले.
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळावरून माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी म्हटले की, “सकाळी सरकारला सांगितले होते की सरसकट निर्णय घ्यावा. ज्यांच्याकडे नोंदी आहे, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र न देता सरसकट प्रमाणपत्र द्यावे, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. उद्यापर्यत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या पासून पाणी घेणे बंद करणार आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “आता आम्ही सहन करणार नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करु द्या. नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील हे तुम्हाला मग कळेल. सरकारला मला सांगायचंय बीडचा जो प्रकार सुरु आहे तो थांबवा. बीडमध्ये जातीयवादी अधिकारी आहेत. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसं उत्तर दिलं जाईल.”