कुठल्याही मंत्र्याला हटवणार नाही
#कोल्हापूर
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना अकार्यक्षमतेमुळे वगळणार, या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. सरकारचे काम सर्व मंत्री चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यामुळे कुठल्याही मंत्र्याला हटवण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी (दि. १३) कोल्हापुरात केला.
गृह आणि अर्थ विभागाचे राज्यमंत्री असलेले शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘आमचे सरकार चांगले काम करत असून आम्ही शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वात एकत्र आहोत. मंगळवारी वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिरातीमधून शिंदे आणि फडणवीसांना मिळून ५० टक्क्यांपेक्षा जास्त जनतेची पसंती असल्याचे दिसून येत आहे. हे सर्वेक्षण महायुतीबाबत आहे, कुठल्याही एका पक्षाबाबत नाही. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. जाहिरातीवरून बेबनाव नाही, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्याशी मी या संदर्भात चर्चा करणार आहे.’’
एखाद्या जाहिरातीमुळे कदाचित गैरसमज पसरले असतील तर आम्ही ते एकत्र बसून चर्चा करून दूर करू. भाजप आणि शिंदे गटात कुणी भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्यात भांडण होणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘‘जाहिरात देताना एखादी चूक झाली असेल तर ती सुधारता येते. आमच्यात काही मतभेद नाहीत. दरेकरांचा काही गैरसमज झाला असेल तर त्यांच्याशी चर्चा करू.’’
वृत्तसंस्था