राज्य सरकारमध्ये नाही मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता: बच्चू कडू
#मुंबई
राज्यातील सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची क्षमताच नाही, असे सांगत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी (दि. २०) आपली नाराजी व्यक्त केली.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची लवकरच वर्षपूर्ती जवळ आली असूनही बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे या सरकारमधील अनेक इच्छुक आमदार नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी वेळोवेळी दिसून येते. आता बच्चू कडू यांनीही या प्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त करून सरकारवर निशाणा साधला आहे.
गतवर्षी २० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत सेनेचे बहुतांश आमदार गेले होते. यामुळे अल्पमतात आलेले उद्धव ठाकरे सरकार कोसळले. या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.
‘गद्दार’ म्हणून हिणवणाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा बच्चू कडून यांनी दिला. ते म्हणाले ‘‘आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल करणार आहे. आम्ही विकासासाठी त्यांच्यासोबत गेलो. उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले आहेत, पण मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडले. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.’’
म्हणे, मी नाराज नाही...
मंत्रिमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल असे आम्हाला वाटले नव्हते. या सरकारने काही चांगली कामे केली. त्यामुळे मी नाराज नाही, पण आता मंत्रिमंडळ विस्तार २०२४ मध्येच होईल असे वाटत आहे. मी यापूर्वीही हा दावा केला आहे. या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची क्षमता नाही, असे सांगत बच्चू कडू यांनी आपली नाराजी लपविण्याचा प्रयत्न केला. वृत्तसंस्था