विधिमंडळाच्या आवारात विरोधकांचे ‘निरमा’ आंदोलन
#मुंबई
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना शुक्रवारी विविध मुद्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे विरोधकांनी शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यांवरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. भ्रष्ट नेत्यांच्या प्रतिमेला निरमा पावडरने आंघोळ घालत आंदोलन करण्यात आले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांच्यावरील आरोपाचे किटाळ दूर होत असल्याने गुजरातमधील निरमा पावडर त्यांना कामी येते असे विरोधकांचे म्हणणे होते.
विरोधकांचे निरमा आंदोलन
राज्यातील अवकाळी पाऊस, मदतीविना असलेले शेतकरी, रेंगाळलेली मदत आणि पंचनामे, गुढीपाडवा झाला तरी आनंदाचा शिधा मिळाला नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात निरमा पावडर, केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. त्यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी देखील विरोधकांनी केली. भ्रष्ट नेत्यांच्या फोटोला निरमाने आंघोळ घालत जोरदार घोषणा देण्यात आल्या.
भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचारी पवित्र : दानवे
सत्तेतील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. भ्रष्टाचारी लोकांना निरमाने स्वच्छ करण्याचे काम आम्ही केले. हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही केले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले ते आज भाजपमध्ये गेले आहेत. भाजपमध्ये गेल्यामुळं ते पवित्र झाल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
भाजपचे राहुलविरोधी आंदोलन
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं आणि यावरूनच आता देशभरात भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. याच वक्तव्यावरून संसदेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. यावर काँग्रेसने नुकताच राहुल गांधींचा एक फोटो ट्विट करत माफी मागायला सावरकर समजलात का? असे ट्वीट केले होते. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिले. ते म्हणाले की, तुम्ही आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही तो सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे. पंतप्रधान मोदी आपल्या मातोश्रींच्या अंत्यविधीनंतर लगेच कर्तव्यावर गेले. राष्ट्रभक्ती, देशभक्ती त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय? कारवाई करायची असेल तर सर्वांवर झाली पाहिजे असंही ते म्हणाले.
गुरुवारी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले, त्याचे आम्ही समर्थन केलं नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असं बोलणं देशद्रोह असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. या देशाचा मान आणि देशाची कीर्ती पोहोचवण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केले आहे. लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा कशी काढली? जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकावला ना? असे सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला केले.