नाराजीनाट्याचा नवा अन् मोठा अंक
#मुंबई
राज्यातील माजी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि सध्या सत्तेत असलेले भाजप-शिंदे गट शिवसेना या पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही ना काही कारणांवरून अंतर्गत धूसफूस सुरू आहे. काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील ‘तू तू मैं मैं’ कमी झाली असतानाच भाजप-शिंदे गटातील कलह लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवरून दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील मतभेद पूर्वी कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर उफाळून आले आहेत. एरवी, युतीबाबत शांतपणे आणि संयमी भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारचा (दि. १३) कोल्हापूर दौरा टाळला.
राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजप-शिंदे गटातील इतके दिवस दबून असलेली धूसफूस या जाहिरातीच्या निमित्ताने उसळी मारून चव्हाट्यावर आली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात शिंदे गटामार्फत राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. यात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचीच छायाचित्रे आहेत. तसेच या जाहिरातीतील इतर मजकूर आणि त्याची मांडणी ही फडणवीसांचे महत्त्व कमी करणारी असल्याचे दिसून येते. शिंदे गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात उभय पक्षांमध्ये उफाळून आलेल्या वादात कळीचा मुद्दा ठरली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी आमच्यात मतभेद नसल्याचे सांगितले. ‘‘देवेंद्र फडणवीसांच्या कानाला इजा झाली आहे, त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्यास सांगितले आहे. यामुळे फडणवीसांनी कोल्हापूर दौरा रद्द केला,’’ अशी सारवासारवदेखील केसरकर यांनी केली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोल्हापुरात जाणार होते. मात्र, मंगळवारच्या जाहिरातीमुळे भाजप नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. यातूनच भाजपमध्ये अस्वस्थता असून याच कारणातून देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौरा रद्द केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर कोल्हापूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्र्यांसह कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.
फोटो असो नसो... मी, फडणवीस जनतेच्या मनात : शिंदे
‘‘फोटो असो नसो, मी आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या मनात आहोत. हे जास्त महत्त्वाचे आहे,’’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या जाहिरातीसंदर्भात कोल्हापूर दौऱ्याआधी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातीलच नाही तर जगातले नंबर वन पंतप्रधान आहेत. याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. आमचे सरकार राज्यात चांगले काम करीत आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेच्या मनात आहोत.’’
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देशात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात शिंदे हे जनतेच्या पसंतीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीवर भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात हे स्पष्टीकरण दिले.
ही तर शिंदेंची मोठी झेप : छगन भुजबळ
फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा
शिंदे गटाने मंगळवारी (दि. १३) वेगवेगळ्या वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देत शिंदे गटाने चांगलीच खळबळ उडवून दिली. ‘झी टीव्ही’ आणि ‘मॅटराईझ’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही जाहिरात देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असा दावा करण्यात आला आहे. या सर्वेक्षणातील सर्वात ठळक बाब म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रिपदासाठी दिलेली पसंती. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रिपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के जनतेला मुख्यमंत्रिपदावर पाहायचे आहे. या संदर्भात शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीत केवळ पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचाच फोटो आहे. या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब आहे. फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे. वर 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे', असा दावाही केला आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.
वृत्तसंस्था