महाराष्ट्रात ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष
#नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ओबीसींना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, या मताचे समर्थन करतानाच महाराष्ट्रात ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी (दि. ४) केला.
ओबीसींना न्याय देण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही अजित पवारांची मागणीदेखील नाना पटोले यांनी लावून धरली. ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी केलेली मागणी योग्य आहे. ओबीसींसाठी आपण ही भूमिका घेतलीच पाहिजे. ओबीसींकडे महाराष्ट्रात दुर्लक्ष होत आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’’
काॅंग्रेस पक्ष कायम ओबीसींच्या बाजूने असल्याचे स्पष्ट करून पटोले म्हणाले, ‘‘ राजकीय जीवनात मी नेहमीच ओबीसींचे प्रश्न मांडले. विधानसभा अध्यक्ष असताना जनगणनेसाठी ठराव मांडला. कर्नाटक निवडणुकीत जातीनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी भूमिका मांडली. ओबीसींसाठी सगळे पक्ष काम करीत असतील तर चांगलेच आहे.’’
नाना पटोले यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर लागल्याने चर्चा सुरू झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. याबाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. असे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर लावू नये, असे माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे. संजय राऊत वृत्तवाहिनीच्या माईकवर थुंकले. असे कृत्य होता कामा नये. पण या पलीकडे संजय राऊतांवर बोलायचे नाही, असे पटोले यांनी आवर्जून नमूद केले.
स्वबळावर मागून वार करणार नाही...
निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून कायम केली जात असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेते तयार होतात आणि पक्षाची ताकद वाढते. या दृष्टीने सर्वच पक्ष प्रयत्नशील असतात. त्यात चुकीचे काहीही नाही. पण, महाविकास आघाडीत जबाबदार घटक म्हणून काम करीत असताना स्वबळावर लढण्याविषयी आम्ही मागून वार करणार नाही. आम्ही जे काही करू ते सांगून करू, असेही पटोले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकरांचा मविआशी संबंध नाही
सध्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि पुणे येथे पोटनिवडणुका लागतील की नाही, याबाबत माझ्या मनात शंका आहे. सर्वेक्षणाचे अहवाल यायला सुरुवात झाली आहे. त्याचा आढावा घेतल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असे पटोलेंनी पोटनिवडणुकीवरील एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहील, असे वाटत नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने आघाडीत भांडणे होऊन खेळखंडोबा होईल आणि यातून ते वेगळे होतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडे केला. या संदर्भात विचारले असता, ‘‘प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीसोबत काही संबंध नसल्याने त्यांच्याविषयी बोलणार नाही,’’ असे म्हणत पटोले यांनी यावर अधिक बोलायचे टाळले.
वृत्तसंस्था