राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी?
# मुंबई
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला राज्यातील सत्तेत सामावून घेतल्यामुळे भाजप खूश आहे. मात्र, अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मंत्रिपदे देताना भाजपच्या काही मंत्र्यांना फटका सहन करावा लागणार आहे.
यातील भाजपच्या काही मंत्र्यांकडील खाती कमी करण्यात येतील तर काहींना मंत्रिपदावर पाणी फेरायला सांगण्यात येऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘मोदींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी त्याग करायला तयार राहा,’’ असा भावपूर्ण संदेश भाजपच्या आमदारांना दिला होता. फडणवीस यांना अपेक्षित असलेला त्याग हा मंत्रिपदाचा असल्याची चर्चा आहे. यावर अद्याप भाजपमधील एकाही मंत्र्याने प्रतिक्रिया दिली नसली तरी ‘‘त्याग करायला लावण्यापर्यंत आपला नंबर तर नसेल ना,’’ या शंकेपायी अनेक जण अस्वस्थ आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना खातेवाटप करतील. यासाठी शिंदे भाजपच्या काही मंत्र्यांची खाती काढून ती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सोपवतील. या प्रकरणी शिंदे शिवसेनेच्या एकाही मंत्र्याच्या खात्याला हात लावणार नाहीत. पण स्वतःची काही वाढीव खाती सोडून ती राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदारांना देतील, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ४० आमदार आहेत. त्यातील ९ जण मंत्री झाले. त्यापैकी बहुतांश जणांकडे एकच खाते आहे. दुसरे खाते असले तरी ते कमी महत्त्वाचे आहे. याउलट भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे दोन-तीन मोठी खाती आहेत. आगामी खातेवाटपात यापैकी एखाद्या खात्यावर टाच येणार असल्याची शक्यता आहे.
गिरीश महाजन यांचे वैद्यकीय शिक्षण हे आवडीचे खाते आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदे देताना महाजनांकडून हे खाते जाऊ शकते. त्यांनी या खात्यासाठी आग्रह धरला, तर अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ग्रामविकास खाते त्यांच्याकडून जाईल. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे महिला-बालकल्याण, पर्यटन तसेच कौशल्य विकास ही तीन खाती आहेत. त्यातील एक किंवा दोन खात्यांवर त्यांना पाणी सोडावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना महिला-बालकल्याण मंत्रालय सोडावे लागेल.
खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला रवींद्र चव्हाण यांच्याकडील अन्न आणि नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तर चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कायम राहील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज ही तीन खाती आहेत. त्यातील एक वा दोन जातील, असे सूत्रांनी सांगितले. या
खातेवाटपात सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्याला हात लावला
जाणार नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी आवर्जून सांगितले. वृत्तसंस्था