न टायर्ड हूँ, न रिटायर्ड, मैं तो फायर हूँ!
#नाशिक
अजित पवारांनी शरद पवार यांच्या वयाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर शरद पवार यांनी शनिवारी नाशिकमध्ये त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘‘न टायर्ड हूँ, न रिटायर्ड, मैं तो फायर हूँ’’ असे सांगत शरद पवार यांनी अजित पवारांनी टाकलेला वयाचा बाऊन्सर स्टेडियमबाहेर भिरकावून देतानाच बंडखोरांना गर्भित इशारादेखील दिला.
राष्ट्रवादीत बंड करून सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणाऱ्या अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या वयाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी जिगरबाज पद्धतीने भाष्य केलं. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गाजलेल्या वाक्याची मदत घेत ‘‘ना टायर्ड हूँ... ना रिटायर्ड हूँ... मैं तो फायर हूँ’’ असं म्हणून पवारांनी वयाच्या मुद्द्यावरून विरोध करणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली.
‘‘भुजबळांना सेफ जागा द्यायची होती, त्यामुळे मीच येवला मतदारसंघाचे नाव सुचवले,’’ अशी माहिती शरद पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. वस्तुस्थिती मांडण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातून या दौऱ्याला सुरुवात करताना, त्यांनी नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.
वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार मैदानात उतरले आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. बंडखोर छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांची शनिवारी पहिली जाहीर सभा झाली.
‘‘शरद पवार यांच्या सभेसाठी नाशिकमध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ठाकरे गट शरद पवारांसोबत आहे. येत्या विधानसभेला भुजबळांचा पराभव करू,’’ असा मोठा दावा ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला.
मी निवृत्त का व्हायचे? काम करण्याची क्षमता माझ्यात आहे. मी कोणत्या वयात निवृत्त व्हायचे? हे मला माहिती असल्याचे प्रत्युत्तर शरद पवार यांनी अजित पवार यांना िदले आहे.वृत्तसंस्था