'मुंबई - गोवा मार्ग गणेशोत्सवाआधी सुरू'
#मुंबई
गेल्या १३ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता नवी डेडलाईन दिली आहे. गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी मंगळवारी दिले. काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते. तसेच, या महामार्गाबाबत पावसाळी अधिवेशनातही मुद्दा उचलून धरण्यात आला होता.
“मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे. मुंबई- सिंधुदुर्ग मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. “समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अठरा तासांचा प्रवास आठ ते दहा तासांवर आला आहे. शेतकरी, प्रवासी यासोबत उद्योग संधी विस्तारण्याच्या दृष्टीने हा उपयुक्त ठरत आहे. अशा विविध दळणवळण सुविधांच्या विस्ताराला शासनाने प्राधान्यक्रमावर घेतले असून, कोकणातही या पद्धतीने दळणवळण सुविधांचा विस्तार करण्यात येईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी जनसामान्यांकडून केली जातेय.