माॅन्सून आला रे!
#पुणे
राज्यात नैऋत्य मोसमी वारे अर्थात माॅन्सूनचे रविवारी (दि. ११) आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग अन् दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात माॅन्सून दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती, तो माॅन्सून रविवारी राज्यात अवतरल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग माॅन्सूनने व्यापला आहे.
केरळमध्ये ८ जून रोजी माॅन्सून आला होता. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यात माॅन्सून दाखल झाला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कामाला लागावे. परंतु पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनी मशागतीची कामे पूर्ण करावी अन् पेरणीसाठी तयार राहावे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे. ते ओसरल्यानंतरची परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
कोकणात माॅन्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत होता. पुढचे दोन दिवस चक्रीवादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार आहे. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याने इशारा दिला होता. किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात अनेक भागात माॅन्सूनपूर्व पावसाच्या सरी पडत होत्या. परंतु आता माॅन्सून दाखल झाला आहे. ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली.
वृत्तसंस्था