शिंदे गटाच्या आमदारांनी केला विनयभंग

धाराशिवच्या 'निर्भय बनो' सभेत असीम सरोदेंचा आरोप, ‘निर्भय नव्हे, मालामाल बनो’ मोहीम असल्याची शिंदे गटाची टीका

MLAsofShindegroupmolested

शिंदे गटाच्या आमदारांनी केला विनयभंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी गुवाहाटीमधील एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी दारूच्या नशेत झिंग होऊन सर्व गोष्टी केल्या, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व वकील असीम सरोदे यांनी केला. तसेच शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या २ आमदारांना मारहाणदेखील करण्यात आली, असा दावाही सरोदे यांनी धाराशिव येथील 'निर्भय बनो' सभेत केला आहे.

त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे असीम सरोदे यांच्या या आरोपांना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. महापत्रकार परिषदेतच कळले की सरोदे ठाकरे गटाचे पुढारी आहेत, ही निर्भय नव्हे मालामाल बनो मोहीम असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

गुवाहाटीला शिंदे गटाचे आमदार जिथे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती, पण स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी काही रूम्स बुक केलेल्या होत्या. त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्राने शोधले पाहिजे. दारूच्या नशेत झिंगत असलेल्या आमदारांनी या गोष्टी केल्या. हा पैशांचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही, असे असीम सरोदे म्हणाले. सरोदेंच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला आठवत असेल तर ठाकरे गटाने महापत्रकार संवाद परिषद घेतली होती. त्या दिवशी त्या ठिकाणी असीम सरोदे ज्या आविर्भावात बोलले, त्यांनी वकील म्हणून बोलायला पाहिजे होते,  पण ते पुढारी म्हणून बोलले. त्याच दिवशी मनात पाल चुकचुकली की हा ठाकरे गटाचा नेता आहे. 

दोन आमदारांना मारहाण केली. एका एअर हॉस्टेसचा विनयभंग केला. अरे तुला कुठे स्वप्न पडले? तिथे सर्व मीडिया, मोठी पोलीस सुरक्षा होती. त्यांना तसेच दीड पावणे दोन वर्षांनंतर जाग आली? हे आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते खूश होतील या भावनेतून त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे या आरोपांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

दोन वर्षे झोपला होता का?

असीम सरोदे यांच्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला. असीम सरोदे दोन वर्षांनी जागी झाले का? असीम सरोदे वकील आहेत ना? त्यांना कायदा आणि नियम कळतो ना? समजा हे असे काही घडले असेल तर त्यावेळी झोपला होता का? काहीतरी रंगवून सांगत आहेत. आम्ही गुवाहाटीहून परत येऊन दोन वर्ष झाली. हे सर्व रचलेले आहे. हे असे रचून आमच्या लोकांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. गुवाहाटीत जा, तक्रार करा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा. जा खात्री करा”, असे प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest