संग्रहित छायाचित्र
अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा नववा दिवस असून आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही २१ तारखेला आंदोलनाची दिशा ठरवू असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Maratha Reservation News)
डॉक्टरांच्या पथकाने रविवारी सकाळी जरांगेंची तपासणी केली. त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जरांगे पाटील म्हणाले की, आमची मूळ मागणी हीच आहे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण येऊच शकत नाही. ६२ टक्के आरक्षण आधीच दिलं आहे. आता किती टक्के देतात ते पाहू. पुन्हा एकदा चॅलेंजचा विषय येऊ शकतोच. दिलेलं आरक्षण रद्द झालं तर आम्हाला आंदोलन करावंच लागणार आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. तसंच आम्ही ओबीसीच आहोत, सगेसोयरे अंमलबजावणीही करून हवीच आहे. साडेतीन महिन्यांपासून काम सुरू आहे. कोट्यवधी मराठ्यांचा हा विषय आहे. २० तारखेला आरक्षण मिळाले नाही तर २१ तारखेला पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार.
आमची लढाई कशासाठी आहे हे सरकारलाही माहीत आहे आणि मराठ्यांनाही माहीत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. २० तारखेला सगेसोयरेंच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा २० तारखेच्या आत स्पष्ट भूमिका केली नाही तर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत, असे सांगून जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या मराठ्यांच्या लेकरांना जे काही आरक्षण दिलं आहे, ते टिकलं नाही तर काय करायचं? आमची लेकरं सांगत आहेत की, आमची चार वर्षे वाया गेली आहेत, आम्ही काय करायचं ? आमच्या पोरांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं. पुन्हा तसंच झालं तर काय करणार? आम्हाला आंदोलन पुन्हा करावं लागणार.