संग्रहित छायाचित्र
जालना: जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन एकाला तरी या अंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी रविवारी (दि. २८) स्पष्ट केले.
या कायद्याअंतर्गत एकादेखील मराठ्याला आरक्षण मिळाले की आंदोलनाचे काय करायचे हे ठरवू. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना या कायद्याचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्यासोयऱ्यांना सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पाहोचल्यावर जाहीर केले.
मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलक पोहाेचल्यानंतर सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, जरांगे यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली. जरांगे युद्धात जिंकले, तहात मात्र हरले, अशा शब्दांत टीका करीत सरकारने केवळ आश्वासनांवर जरांगे यांची बोळवण केल्याचे बोलले गेले. काहींनी तर जरांगे यांच्यावरच संशय व्यक्त केला. याची दखल घेत अंतरवाली सराटी येथे पोहोचल्यावर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जरांगे म्हणाले, ‘‘सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सरकारने अध्यादेश काढला. ज्याची कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे, त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला त्या कागदपत्राच्या अंतर्गत एक तरी प्रमाणपत्र मिळायला हवे. हे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावे, असे मला वाटते.’’ सगेसोयऱ्यांचा कायदा पास झाला पण फायदाच नाही झाला तर फायदा काय, असा सवालही जरांगे यांनी यावेळी उपस्थित केला.
गाफिल राहिले तर आंदोलन फसते. आपण सावध आहोत. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय हे होणार नाही. सरकारने अध्यादेश काढला, त्याबद्दल कौतुक आहे, पण त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण सावध राहायचे आहे. विजय अजून दहा फुटावर आहे. थोडं आणखी पुढे जाऊ. चार पावलं चालावे लागेल. पण खऱ्या विजयाचा आनंद मिळेल ना… आपण लांबूनच का आनंद साजरा करायचा? सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघणे खूप महत्त्वाचे होते, असे राजपत्र क्वचितच निघते. याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. खरा गुलाल हा कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर उधळू, असे म्हणत त्यांनी सहकाऱ्यांना सबुरीचे आवाहन केले.
आरक्षणाचे पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी कार्यक्रम घेऊ. तोपर्यंत कोणताही विजयी कार्यक्रम घ्यायचा नाही. मुंबईला गेलो, अध्यादेश झाला. राज्यभर फिरलो, ५४ लाख नोंदी मिळाल्या. केवळ मोर्चे काढून ताकद दाखवून ओळख मिळवण्यात मला रस नाही. कोणताही कार्यक्रम घेतल्यावर समाजाचा फायदा झाला पाहिजे यावरच माझा भर आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
वाया गेलेल्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका; सदावर्ते, भुजबळ यांच्यावर जरांगेंचा निशाणा
अंतरवाली सराटीत पोहोचताच मनोज जरांगे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘‘वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, यांचे ऐकायची गरज नाही. घटनातज्ज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचे आहे,’’ असे जरांगे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधतांना म्हटले आहे.
उल्हास बापट आणि उज्वल निकम यांची प्रतिक्रिया बघा. बाकीचे हे वाया गेलेली लोकं आहेत. यांचे बोलणे मनावर घ्यायची गरज नाही. अध्यादेश पारित झाला, हा मराठ्यांच्या हिताचा निर्णय आहे. आता करायचे असल्यास कोणीही चॅलेंज करू शकतो आणि न्यायालयामध्ये जाऊ शकतो. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले म्हणजे मराठ्यांचा सातबारा पक्का झाला. कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला अधिवेशन घ्यावे लागणार आहे. घटनातज्ज्ञांनी जे मत मांडले, त्यानुसार हे समजून घेणे गरजेचे आहे. मी अनेक अभ्यासक, तज्ज्ञ वकील बोलावले होते. सर्वांनी शब्दाचा किस पाडला. ‘याला काहीच होऊ शकत नाही, समाजासाठी हा कायदा खूप मोठा झाला आहे,’ असे त्यांचे म्हणणे आहे. हा कायदा आयुष्यभरासाठी झाला आहे, असे जरांगे यांनी सांगितले.