संग्रहित छायाचित्र
जालना: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० तारखेच्या मुंबईतल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सरकारला इशारादेखील दिला आहे. (Antarwali Sarati)
मनोज जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की, कुणीही घरी रहायचं नाही. लेकरांना मोठं करण्यासाठीचं हे शेवटचं आंदोलन आहे. कुणाचं वाहन अडवलं जाणार नाही, कुणालाही भिण्याची गरज नाही. मराठा बांधवांनी तालुक्यात, गावात बैठक घ्यायला सुरु करा. आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सगळ्या ताकदीनीशी मराठा तयार आहे. सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार नाही. सरकारने आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करण्याचं स्वप्न बघू नये. मराठे शांततेत येत आहेत, त्यांना शांततेत आंदोलन करु द्या. सरकारने जरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही चारही बाजूने तयारी केली आहे. त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळेल, आमची तयारी कशी आहे ती. सुरुवातीला कमी लोक दिसतील. नंतर मात्र कोट्यवधी लोक मुंबईत असतील. मराठा समाज ओबीसींमध्ये असतानाही आरक्षण दिले जात नाही. (Maratha Reservation News)
कायद्याच्या चौकटीत असणारे सगळे निकष पार केले असले तरी आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवलं जात आहे, हे चुकीचे आहे. त्यांनी जर आम्हाला डिझेल घेऊ दिले नाही, गॅस घेऊ दिला नाही तर आम्हीही त्यांचे दूध, भाजी बंद करणार आहोत. भविष्यात दाळी, धान्य सगळे बंद करणार आहोत. आम्ही डिझेलविना गाड्या चालवू आणि गॅसविना लाकडे पेटवू, असे जरांगे म्हणाले.
सरकारने मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण याचे दूरगामी परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. मुळात त्यापूर्वीच सरकारने आरक्षणाचा निर्णय घेणं गरजेचे आहे. सरकारने कसलाही दगाफटका करण्याचा विचार करु नये, आम्ही सर्व बाजूंनी तयारी केली आहे.वृत्तसंंस्था