Maratha Reservation: जरांगेंच्या 'चलो मुंबई'चा मार्ग झाला मोकळा

मुंबई: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात दाखल झालेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sat, 13 Jan 2024
  • 12:27 pm
Manoj Jarange

संग्रहित छायाचित्र

मराठा आंदोलनाविरोधात दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल

मुंबई: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात दाखल झालेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शु्क्रवारी (दि. १२) फेटाळून लावली. यामुळे मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. (Manoj Jarange Patil)

हेमंत पाटील नामक व्यक्तीने मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर ‘‘आम्ही येथे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी बसलो नाही, त्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, तिकडे तुम्ही जायला हवे,’’ असे खडे बोल यावेळी न्यायालयाने पाटील यांना सुनावले.

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समुदायांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. २० जानेवारी याच दिवसापासून दोन्ही समाजांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेची भीती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी पाटील यांनी आपल्या याचिकेद्वारे केली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला.

‘‘आम्ही त्यांना कसे रोखणार? हे आमचे काम नाही. न्यायालय येथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बसलेले नाही. आम्हाला याहून महत्त्वाची कामे आहेत, असे खडेबोल यावेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला सुनावले.

दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अवघ्या राज्याचे रान पेटवले आहे. मराठा समाज मुंबईत आल्यानंतर आरक्षण घेऊनच राज्याची राजधानी सोडेल अन्यथा नाही, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला दिला आहे. यामुळे सरकारपुढे कठीण प्रसंग उभा ठाकला आहे.  

पायी दिंडी ज्या गावातून जाईल त्या गावच्या परिसरातील नागरिकांनी त्या गावच्या ठिकाणी जमा व्हावे. तेथून पुढे एकत्र प्रवास करावा. ज्या गावावरून दिंडी जाईल त्या गावातील लोकांनी मुंबईला जाणाऱ्या लोकांची रस्त्यात खाण्यापिण्याची व्यवस्था करावी. गावकऱ्यांनी एकत्र येऊन शक्य तेवढी मदत त्यांना करावी, असे आवाहनही जरांगे यांनी नागरिकांना केले आहे. 

असा असेल मार्ग

मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह मुंबईतील आझाद मैदानावर २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत.  जरांगेंनी आपल्या मुंबईला जाण्याच्या मार्गाची घोषणा याआधीच केली आहे. मराठा समाजाची पायी दिंडी २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघेल. त्यानंतर ती मजल दरमजल करत अहमदनगर-पुणेमार्गे मुंबईला पोहोचेल.

ही दिंडी जालन्याच्या आंतरवाली सराटीहून शहागड, गेवराई (बीड), पाडळ शिंगी, तांदळा, मातुरी, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, करंजी, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव, सुपार, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपासहून चंदननगर मार्गे शिवाजीनगर पुण्याला पोहोचेल. त्यानंतर तेथून पुढे ती पुणे-मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी चेंबूरमार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल, असे जरांगे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest