मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती मी पूर्ण करत आहे : मुख्यमंत्री शिंदे
वाशी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीला जावून मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. त्यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला गेला. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.
यावेळी सकल मराठा समाजासमोर भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचा,प्रमाणपत्र वाटण्यासाठी शिबिरं लावण्याचा, जस्टीस शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा, सगेसोयरे शब्दाबाबत अधिसूचना काढण्याचा आणि वंशावळ जुळणीसाठी समिति नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मागासवर्गीय आयोगाकडून कुणबी सोडून इतरांना टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती मिळतील. जे आंदोलनात मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला आणि नोकऱ्या देणार. सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो अशी घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. देशाचेच नाही तर जगाचं लक्ष आपल्या आंदोलनाकडे लागलं होतं असे ते म्हणाले.
शिस्त ठेवली. अतिशय संयमाने आणि शिस्तीने, कुठेही गालबोट न लागता, इतरांना त्रास होवू नये याची काळजी घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांचे आभार मानले.
या आंदोलनात जरांगे पाटील आणि लोक यांच एकमेकांवरील प्रेम बघायला मिळालं. जरांगे पाटलांनीही वेळोवेळी शिस्तीचा बडगा दाखवला, इतरांना त्रास होवू दिला नाही याबद्दल त्यांनी जरांगे पाटील यांना धन्यवाद म्हटले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मराठ्यांच्या वेदनेची मला कल्पना आहे. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती मी पूर्ण करत आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी कार्यपद्धती आहे. आज आनंद दिघे यांची जयंती आहे. २३ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यांचे आशीर्वाद आणि सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा पाठीशी आहे.
पुढे ते म्हणाले, खरं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे. स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा आजचा ऐतिहासिक सोहळा साजरा होतोय. त्यांनीही बलिदान दिले. त्यांना वंदन करतो.
हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी आणि सर्वांना न्याय देण्यासाठी निर्णय घेतो. मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं. नेता केलं. पण मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा संधी आली तेव्हा ती द्यायला हवी होती. आजचा दिवस आनंदाचा आणि गुलाल उधळण्याचा आहे असे ते म्हणाले.
मनोज दादांनी भाषणात सांगितलं, कुणबी नोंदी मराठवाड्यात दिल्या जात नव्हत्या. मात्र सरकारची मानसिकता देण्याची आहे. गावागावात मराठा आणि ओबीसी समाज एकत्र नांदतो. एकत्र काम करतो. आम्हाला कुणाचं घ्यायचं नाही. मात्र आमच्या हक्काच मिळायला पाहिजे असे जरांगे पाटील यांनी सांगितलं. सरकारनेही तेच केलं. सरकार जरांगे पाटलांच्या मागे उभं राहिलं असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्य माणूस जेव्हा समाजाचं नेतृत्व करतो तेव्हा आंदोलनाला एक वेगळेपण असतं. मुख्यमंत्रीही एक सर्वसामान्य माणूस आहे.म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम सरकारने केलं आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.