मंत्री धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची अजित पवारांकडे मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच मराठा क्रांती ठोक मोर्चाने मंत्री धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असताना ही माहिती दिली.
केरे पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही एक निवेदन दिले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खंडणीखोर वाल्मिक कराडच्या विरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मुंडे यांची हकालपट्टी न केल्यास मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदार, खासदार आणि मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा केरे पाटील यांनी दिला.
केरे पाटील पुढे म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या रूपाने मराठा समाजातील आमच्या जवळचा एक भाऊ गेला आहे. तसेच, अजित पवारांनी सांगितलं की कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि पवार यांच्यात आहे. त्याबद्दल माहिती नसल्याचं केरे पाटील यांनी संगितलं.