संग्रहित छायाचित्र
जन-गण-मन' हे आपले राष्ट्रगीत नसून वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत असावे असे वादग्रस्त विधान सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाँचिंगवेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना रामगिरी महाराज म्हणाले की आपल्याला आतापर्यंत चुकीचा इतिहास शिकवला गेला असून आर्य हे आपले पूर्वज आहे. ते बाहेरून आलेले नाही असा दावा त्यांनी केला. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी गीत का लिहिले, तसेच त्यांना नोबेल पारितोषिक कसे मिळाले? यावरही रामगिरी महाराज यांनी भाष्य केले.
रामगिरी महाराज म्हणाले, १९११ साली कोलकाता येथे ‘जन गण मन’ हे गीत तत्कालीन ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम याच्या स्तुतिसाठी टागोर यांनी गायले गेले होते. हे गीत भारत राष्ट्राला संबोधित करत नाही. वंदे मातरम हेच देशाचे खरे राष्ट्रगीत असायला हवे. भविष्यात याचा विचार करावा लागेल. तसेच त्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल.
टागोर यांनी लिहिलेल्या गीताला विरोध करताना रामगिरी महाराज यांनी मात्र त्यांच्या कार्याचे कौतुक केले. राजसत्तेशी समन्वय साधत त्यांनी शिक्षण संस्था चालवल्या. त्यासाठी त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केली असावी त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, असे महंत रामगिरी महाराज यांनी म्हटले.
मिशन अयोध्या या चित्रपटाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. आजपर्यंत हिंदू साधू संतांना चित्रपटांमधून चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मगुरु विरोधात असे दाखवले गेले नाही. आज मात्र तशी परिस्थिती नसल्याचे रामगिरी महाराज यांनी म्हटले.